Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अनु. जातीचे नगरसेवक महापालिकेचे किंगमेकर ?

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. सात बेटांवर वसलेल्या मुंबई महानगरपालिकेचे आकारमान आणि पालिकेचा ३७ हजार ५०० कोटींचा अर्थसंकल्पामुळे या निवडणुकीला एका राज्याच्या निवडणुकीप्रमाणे पाहिले जाते. देशाची आर्थिक राजधानी आणि जगाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेवर आपली सत्ता असावी म्हणून प्रत्येक राजकीय पुढारी आपली ताकद पणाला लावत असतो. इतका सर्व करूनही गेल्या काही वर्षात अपक्ष नगरसेवक किंगमेकर ठरले आहेत. यावेळी मात्र मागासवर्गीयांमधील अनुसूचित जातीचे नगरसेवक मुंबईचा महापौर कोण असावा हे ठरवू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईमध्ये २४ वॉर्डमधून २२७ नगरसेवक निवडून येतात. मुंबईची सध्याची लोकसंख्या १ करोड २४ लाख इतकी आहे. यापैकी ९१ लाख ८७ हजार मतदार आहेत. मुंबईमध्ये शहर आणि उपनगर असे दोन जिल्हे आहेत. मुंबई शहराची लोकसंख्या ३० लाख असून उपनगरची लोकसंख्या ९३ लाख आहे. मुंबईमधील उपनगरांची लोकसंख्या वाढल्याने नगरसेवकांच्या प्रभागांची नव्याने मांडणी करण्यात आली आहे. यानुसार मुंबई शहर परिसरातील नगरसेवकांची संख्या 63 वरून 56 झाली आहे. शहरातील सात वॉर्ड कमी झाले असून, पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढले आहेत.

नव्या प्रभाग रचनेनुसार ए ( फोर्ट), बी( पायधुनी), सी(चंदनवाडी), डी (ग्रँट रोड), ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी झाले आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड, पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रुझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. एल (कुर्ला), एस (भांडुप) विभागात एक वॉर्ड वाढला आहे. एम पूर्व (मानखूर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढली आहे.

फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करताना मागासवर्गीय असलेल्या अनुसूचित जातीसाठी चांगली बातमी आली आहे. मुंबई महापालिकेच्या सन १९९२ च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी १० जागा, १९९७ च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी १४ जागा, २००२ च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी १५ जागा, तर २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीमध्ये ११ जागा आरक्षित होत्या. मुंबईमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढल्याने सन २०१७ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी १५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

मुंबईमध्ये १९९१ सालच्या जणगणने प्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या ६ लाख ४६ हजार इतकी होती. सन २००१ च्या जणगणने वेळी अनेकांच्या जातीची आणि अनुसूचित जातीमध्ये असल्याची माहिती नोंद न केल्याने लोकसंख्येचा आकडा कमी होऊन ५ लाख ८४ हजारावर आला होता. परंतू अनुसूचित जातीच्या लोकांची गणना योग्य प्रकारे झाली नसल्याने या समाजातील लोकांनी जनजागृती करून २०११ च्या जनगणने वेळी योग्य नोंदी घालण्याचे आवाहन केल्याने सन २०११ च्या जणगणने वेळी अनुसूचित जातीची लोकसंख्या ८ लाख इतकी नोंद झाली आहे. हा आकडा फक्त नोंद झालेल्या अनुसूचित जातीच्या लोकांचा असला तरी वास्तविक पाहता हा आकडा यापेक्षा अधिक आहे.

राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत. या समाजावर अन्याय अत्याचार होत असताना त्यांचा कायदे बनवणाऱ्या संसद आणि विधिमंडळात प्रतिनिधी नसल्याने अन्याय अत्याचाराविरोधात म्हणावा तसा आवाज उचलला जात नाही. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघ असले तरी यामधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षाशी बांधील असल्याने अश्या लोकप्रतिनिधींनी अन्याय अत्याचार होताना संसद आणि विधिमंडळात आवाज उचलल्याचे निदर्शनास आलेले नाही.

हि परिस्थिती बदलण्यासाठी आता अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांचे प्रश्न आपले समजून त्याविरोधात आवाज उचलणाऱ्या लोकांना राखीव असलेल्या मतदार संघामधून निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. अनुसूचित जातीमधील मतदारांची एकगठ्ठा मते आपल्याच उमेदवाराला देऊन त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणावे लागणार आहे. आपलाच उमेदवार निवडून आणायची जबाबदारी उचलण्याची आवश्यकता आहे. आपल्या समस्यांना, प्रश्नांना आवाज उचलणारे लोकप्रतिनिधी समाजातुन निवडून आल्यास अनुसूचित जातीमधील लोकांना न्याय मिळणे शक्य होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आकडेवारी पाहता सातत्याने कोणत्याही पक्षाला बहुमत न देता सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांवर अवलंबून राहावे लागत आले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये राखीव असलेल्या १५ मतदार संघाव्यतिरिक्त ७५ ते ८० जागा अश्या आहेत कि ज्या ठिकाणची अनुसूचित जातीची लोकसंख्या अडीच हजाराहून अधिक आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ३ ते ५ हजार मते मिळवणारे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याच ठिकाणी अनुसूचित जातींच्या लोकांनी आपले उमेदवार निवडून आणल्यास निवडून आलेले नगरसेवक सत्ता स्थापनेमध्ये किंगमेकर ठरू शकतात.

याचे अनेक फायदे होऊ शकतात. किंगमेकर म्हणून सत्ता स्थापन करण्यास सहकार्य केल्याने अनुसूचित जातीच्या नगरसेवकांना विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य बनता येवू शकते. अनुसूचित जातीच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा उपयोग केला जाऊ शकतो. अनुसूचित जाती विरोधात काही करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर अंकुश ठेवता येऊ शकतो. महापालिकेत अनुसूचित जाती विरोधात सुरु असलेले षडयंत्र रोखता येऊ शकते, पालिकेत रिक्त असलेली अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांची २० हजाराहून अधिक पदे भरता येऊ शकतात पण त्यासाठी अनुसूचित जातीच्या लोकांनी एक होऊन आपले स्वतःचे हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
ई-मेल - jpnnews100@gmail.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom