Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत 1510 ठिकाणी 4717 कॅमेरे - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 2 ऑक्टोबरला लोकार्पण

मुंबई, दि. 30 : मुंबई शहरातील सव्वा कोटी नागरीकांची सुरक्षितता अधिक भक्कम करणे, मुंबई पोलीसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास व तपास यंत्रणांना सहाय्यभूत ठरणारा, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन सक्षम होण्यास मदत करणारा, महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक सक्षमपणे राबविण्यास सहाय्यभूत ठरणारा सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 2 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याची माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली आहे.
मुंबई शहरावरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई शहराची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरात जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार संपूर्ण मुंबई शहरात 1510 ठिकाणी 4717 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये 3727 फिक्स बॉक्स कॅमेरे, 970 पीटीझेड कॅमेरे, 20 थर्मल कॅमेरे आहेत. तर 5 मोबाईल व्हिडीओ सर्व्हिलन्स व्हॅन्सचा समावेश आहे. हे सर्व कॅमेरे, कमांड व कंट्रोल सेंटर आणि मोबाईल व्हॅन हे एकमेकांशी फायबर, वायरलेस, व्ही सॅट यासारख्या अत्याधुनिक नेटवर्क कनेक्टिव्हीटीद्वारे जोडण्यात आले आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती साठविण्यासाठी 2 ठिकाणी अद्ययावत डाटा सेंटर उभारण्यात आली आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्तालय, कलीना आणि वरळी येथील वाहतुक पोलीस मुख्यालय या 3 ठिकाणी संनियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. मुंबई शहरातील 92 पोलीस स्टेशन, 13 पोलीस उपायुक्त कार्यालये, 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयांबरोबरच राजभवन, मंत्रालय, गिरगांव चौपाटी,सत्र न्यायालय, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय अशा महत्वाच्या 120 पेक्षा अधिक ठिकाणी पाहणी कक्ष राहणार आहेत. याठिकाणांवरुन मुंबई शहरातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यास पोलीसांना मदत होणार आहे. या प्रकल्पात वाहनांचे नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडीओ ॲनालिटिक्स तसेच एक हजार पोलीस वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा राहणार असून यामुळे पोलीसांना तात्काळ कार्यवाही करण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारांना ओळखण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांची ओळख पटविण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणच्या 100 पेक्षा अधिक खाजगी व सार्वजनिक संस्थांना सीसीटीव्ही यंत्रणेचे सहाय्य देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासंदर्भात तांत्रिक व इतर सहाय्यासाठी 24/7 मदत व सेवा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही प्रकल्प सुनियंत्रित पध्दतीने चालण्यासाठी तांत्रिक व मनुष्यबळाचा या केंद्रामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही प्रकल्पाचे काम मेसर्स लार्सन ॲन्ड टुब्रो (एल ॲन्ड टी) कंपनी मार्फत करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मेसर्स प्राईस वॉटर हाऊस कुपर्स हे आहेत. या प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती पुढील 5 वर्षे एल ॲन्ड टी कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत. या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवणे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे, वाहतुकीवर नियंत्रण व शिस्त लावण्यास मदत होणार असल्याची माहितीही श्री. बक्षी यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom