Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

भाऊचा धक्का ते नेरूळ ते मांडवा जलवाहतूक मार्च 2018 पूर्वी सुरू करणार - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7: भाऊचा धक्का ते मांडवा ते नेरूळ यादरम्यान रोरो प्रवासी सेवा मार्च 2018 पूर्वी सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. यामुळे जलवाहतुकीचे मुंबईकरांचे 20 वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे सेवा, बेस्ट या दळणवळणाच्या सेवांचा सर्वंकष दृष्टीकनोतून विचार करून त्या एकत्रित करण्यात येत आहेत. त्यामध्ये आता जलवाहतुकीचाही समावेश करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भाऊचा धक्का येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ऑईल जेट्टी, प्रवासी टर्मिनल आणि बंकरींग टर्मिनलच्या कामाचा भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, आज तीन अत्यंत महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ झाला आहे. हे तिनही प्रकल्प मुंबईसाठी लाभदायक आहे. गेल्या 20 वर्षांपासून मुंबईकर जलवाहतुकीचे स्वप्न पाहत आहेत. आज भाऊचा धक्का ते मांडवा आणि मांडवा ते नेरूळ या त्रिकोणातील जलवाहतूकीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मार्च 2018 पूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मांडवा ते भाऊचा धक्का आणि नेरूळ हे अंतर पार पाडण्यासाठी रस्ता मार्गे किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी जातो. मात्र रोरो सेवा सुरू झाल्यावर हे अंतर अवघ्या १५ ते १७ मिनीटांत पार करता येणार आहे. रोरो सेवेमुळे फक्त प्रवाशीच नव्हे तर बस, कार यांची देखील वाहतूक केली जाणार असल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी होऊन पर्यायाने इंधनाची बचत आणि प्रदुषणही कमी होणार आहे. मुख्य म्हणजे सामान्यांच्या प्रवासाच्या वेळेत होणारी बचत ही महत्वपूर्ण आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या समुद्रात जलवाहतूक सुरू झाल्यास त्याचा फायदा उद्योग आणि रोजगार वृद्धीसाठी होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दोन वर्षात मुंबईच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. किमान शंभर किलोमीटर लांबीच्या मेट्रोच्या नेटवर्कच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या उपनगरी रेल्वेसेवेतून किमान 70 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात. मेट्रोच्या माध्यमातून 80 लाख प्रवाशी वाहतूक करण्याचे उद्दिष्ट असून मुंबईच्या दळणवळणासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहतूक सेवांचे एकत्रीकरण करून एकाच तिकीटावर ह्या सेवा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईच्या समुद्रात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षात स्वच्छ नितळ समुद्र हे स्वप्न प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रवासी जेट्टी बांधण्यासाठी 69 प्रस्ताव पाठविले होते त्यापैकी नऊ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरीत 60 प्रस्तावांना देखील तातडीने मंजुरी मिळेल. ज्या जेट्टींना मंजुरी मिळाली आहे त्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात येईल. जेणे करून राज्याच्या पर्यटनाला त्याचा लाभ होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम डिसेंबर मध्ये सुरू करण्यात येणार असून नवी मुंबई विमान तळाच्या कामासही येत्या दोन महिन्यात सुरूवात करण्यात येईल. विकासाचा वेग आणि पायाभूत सुविधांचा वेग समकक्ष तयार करण्यात येत असल्याने विकासाला गती मिळाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

समुद्रामार्गे केबल टाकून एलिफंटा येथे वीज पुरवठ्याची सोय करण्यात येणार असून पर्यटकांना एलिफंटा येथे मुक्काम करता येईल, अशी सोय केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, या तीन प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. जलवाहतूक सुरू झाल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन इंधनाची बचत होणार आहे. राज्य शासनाने प्रवाशी जेट्टींकरिता 69 प्रस्ताव पाठविले होते. त्यातील बोरीवली, गोराई, विरार अश्या नऊ जेट्टींच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची घोषणा करीत उर्वरित 60 प्रकल्पांनाही लवकरच मंजुरी देऊ असे श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले. मुंबईचं प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यादृष्टीने जलवाहतूक हा सक्षम पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी यावेळी तिन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

असे आहेत तीन महत्वपूर्ण प्रकल्प
जवाहर द्विप येथे (जेडी 5) ऑईल जेट्टी-
देशातील सर्वात मोठी जेट्टी. इंधनांनी भरलेली भव्य टॅंकर्स या जेट्टीवर थेट आणून त्याची चढ-उतार करणे सुलभ होणार आहे. मार्च 2019 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार

बंकरींग टर्मिनल- बंकरिंग टर्मिनल म्हणजे जहाजांना इंधन भरण्याचे ठिकाण. देशातील पहिले टर्मिनल जवाहर द्विप -२ येथे करण्यात येत आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

रोरो पॅक्स सेवा- नेरूळ ते मांडवा आणि मांडवा ते भाऊचा धक्का अशा त्रिकोणात रोरो सेवा..नेरूळ ते मांडवा अंतर अवघ्या 17 मिनिटात तर भाऊचा धक्का ते मांडवा अंतर 15 मिनिटात पार करता येणार. प्रवाशांसोबतच बस, कार यांची देखील रोरो मधून वाहतूक करणार.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom