मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 7- मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज असून या मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण विभाग आणि पुण्याच्या शांतीलाल मुथ्था फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमा संदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचेसह प्रधान सचिव शालेय शिक्षण नंदकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, एमसीईआरटीचे संचालक गोविंद नांदेडे, शांतीलाल मुथ्था फाऊन्डेशनचे शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज 20 कोटीपेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविण्याची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना शिक्षकांचे मूल्यसंवर्धन आणि विद्यार्थ्यांचे गुणवत्तासंवर्धनावर विशेष भर देण्याची गरज असून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही नागरिकत्व रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

2009 साली मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील 500 शासकीय शाळांमध्ये झाली. 35 हजार विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाचा लाभ घेतला शिक्षणातील लोकशाही मूल्यांशी संबंधित अध्ययन निष्पत्ती लक्षणीय प्रमाणात साध्य झाल्याचे येथील मूल्यमापन अभ्यासामध्ये दिसून आले. आता बीडच्या धर्तीवर सुरु झालेला पथदर्शी प्रकल्प सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रचनावादी दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांचा समावेश असणे आवश्यक आहे असे मत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

‘एमसीईआरटी’मार्फत हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून जागतिक स्तरावर या उपक्रमाचे मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी हा उपक्रम शांतीलाल मुथ्था फाऊन्डेशनच्या वतीने 34 विविध समूहामध्ये राबविण्यात येत असून त्या उपक्रमाला राज्य शासनाने सहकार्य केले आहे. मूल्यवर्धित महाराष्ट्र घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल असे करीत असताना सेवानिवृत्त शिक्षकांची या उपक्रमात मदत घेतली जाऊ शकेल का ही बाब तपासून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीची माहिती या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी या संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून या संस्थेतील मुख्य प्रशिक्षक 2000 शिक्षकांना सोप्या पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित करतील अशी माहिती तावडे यांनी यावेळी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एमसीईआरटी)च्या वतीने सादरीकरण करण्यात आले.

Post Bottom Ad