Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

साकीनाक्यातील 12 मृत्यूनंतर पालिकेला आली जाग


३४ ठिकाणी 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष' सुरु करणार -
मुंबई । प्रतिनिधी -
साकीनाका येथील भानू फरसाणच्या कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या १२ जणांच्या मृत्यू नंतर मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम २००६' च्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यासाठी तसेच अग्निसुरक्षा विषयक तपासणीसाठी ३४ 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कक्षांचे प्रशासकीय नियंत्रण हे संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे (वॉर्ड ऑफीसर) असणार आहे. तथापि, या कक्षांच्या तांत्रिक बाबींचे नियंत्रण हे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडे असणार आहे.

साकीनाक्यातील आगीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार, उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) राम धस, उपायुक्त (अतिक्रमणे निर्मूलने) निधी चौधरी, प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, विधी अधिकारी जेरनॉल झेवियर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध व्यवसायांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने एल.पी.जी. सिलिंडर, पाईप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड या सारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत (Fire Codified Requirements) याची मुद्देसूद माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानुसार आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत अथवा नाही? याची तपासणी करण्यासाठी अग्निशमन केंद्र निहाय प्रत्येकी एक याप्रमाणे ३४ 'अग्निसुरक्षा अंमलबजावणी कक्ष' सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि, 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी संबंधितांना एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

अग्निसुरक्षा विषयक बाबींची अंमलबजावणी करताना 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार काय काळजी घ्यावी? याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये एल.पी.जी. सिलिंडर, पाईप्ड नॅचरल गॅस, विद्युत उपकरणे, रॉकेल, केरोसिन (रॉकेल), डिझेल, कोळसा वा लाकूड या सारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर व्यवसायासाठी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या 'फायर कोडीफाईड रिक्वायरमेंट' नुसार आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करवून घेण्यासाठी संबंधित व्यवसायिकांना एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधी नंतर ज्या ठिकाणी अंमलबजावणी झाली नसेल, त्याबाबत संबंधितांविरुद्ध 'महाराष्ट्र फायर प्रीव्हेंशन व लाईफ सेफ्टी मेझर्स ऍक्ट' अंतर्गत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याद्वारे संबंधित जागा बंद (Seal) करणे, सदर जागेचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच सदर धोकादायक व्यवसाय बंद करण्याविषयीची कारवाई 'बृहन्मुंबई महापालिका अधिनियम' व 'महाराष्ट्र स्लम ऍक्ट' यानुसार सहाय्यक आयुक्तांद्वारे केली जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom