Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गुजरात निकालांचा भाजपच्या नगरसेवकांनी घेतला धसका


मुंबई । अजेयकुमार जाधव - 
गुजरातच्या निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुजरातमध्ये भाजपाच जिंकणार, भाजपाला १२० ते १३० जागा मिळणारच असे छातीठोकपणे मुंबई महानगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांकडून सांगण्यात येत होते. गुजरातच्या निकालानंतर भाजपाला कमी जागा भेटल्याचा धसका या नगरसेवकांनी घेतल्याचे पहायला मिळत आहे.

गुजरात निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. गुजरातमध्ये गेले २२ वर्षे भाजपाची सत्ता आहे. भाजपाची सत्ता असल्याने विकासाच्या मुद्द्यावर हि निवडणूक लढवणार असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले होते. नंतर मात्र प्रचारावेळी विकासाचा मुद्दा बाजूला राहिला होता. गुजरातमधील प्रचारासाठी संसदेचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. देशभरातील भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रीय मंत्री, भाजपा अध्यक्ष अमित शाह व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचा प्रचार करत होते. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांवर प्रचाराची धुरा देण्यात आली होती. यामुळे भाजपा अध्यक्षांनी भाजपा १५० जागा मिळवेल असा दावा केल्याने मुंबई महापालिकेतून गुजरातला प्रचारासाठी गेलेल्या नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपा १२० ते १३० जागा जिंकेल असा दावा करत होते. गुजारतमध्ये मागील निवडणुकीत भाजपाला ११५ जागा मिळाल्या होत्या. यात घाट होऊन भाजपाला अवघ्या ९९ जागा मिळाल्या आहेत. 

भाजपाने गुजरातमध्ये सत्ता राखली असली तरी त्यांच्या जागा मात्र कमी झाल्या आहेत. यामुळे पालिकेतील भाजपा नगरसेवकांच्या तोंडावर नाराजी स्पष्ट दिसत होती. नगरसेवकांनी आपली कामगिरी पार पडली असली तरी जागा कमी झाल्याचा धसका घेतल्याचे चित्र पालिकेत दिसत आहे. अनेक नगरसेवक खाजगीमध्ये आपल्या केंद्रीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत होते. केंद्रीय नेत्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांचा, नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान सी प्लेन साबरमती नदीत उतरवणे व अश्या इतर केलेल्या इव्हेन्टमुळे नागरिकांनी भाजपाकडे पाठ फिरवल्याची चर्चा नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. भाजपाच्या केंद्रीय प्रवक्त्यांनी जिग्नेश मेवानीचे डिपॉझिट जप्त होणार असे केलेले वक्तव्यही भाजपाला भोवले असून भाजपाने अश्या चुका टाळल्या असत्या तर गुजरातमधील निकाल वेगळा लागला असता. भाजपा नेतृत्वाला हा २०१९ लोकसभेपूर्वीचा इशारा असल्याने केंद्रीय नेत्यांनी हवेत न उडता आपली पावले जमिनीवर राहतील याचा प्रयत्न केला पाहिजे अशी चर्चा सुरु आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom