महापालिका रुग्णालयातून स्वस्त जेनेरिक औषधे मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2017

महापालिका रुग्णालयातून स्वस्त जेनेरिक औषधे मिळणार


मुंबई । प्रतिनिधी - महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात औषधें नसल्याने जास्त पैसे देऊन खाजगी मेडिकल मधून महागडी औषधे खरेदी करावी लागतात. यावर उपाय म्हणून पालिका रुग्णालयात जेनेरिक औषधांची दुकाने सुरु करून रुग्णांना स्वस्त औषधे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत पालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्षा रोहीणी कांबळे यांनी दिली.

मुंबईत लोकसंख्या वाढीबरोबरच प्रदूषण व रोगराईतही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना कर्करोग, क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, हृदयरोग आदीं आजारांचा प्रादुर्भाव होतो. काही आजारावरील औषधे फारच महागडी असतात. तर कित्येकवेळा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असतो. यामुळे पालिकेच्या रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना महागड्या दरातील औषधे बाहेरील खाजगी मेडिकल मधून खरेदी करावी लागतात. बहुतेक रुग्णांना कर्जाने, उधारीने पैसे घेऊन महागडी औषधे खरेदी करावी लागतात. सध्या पालिकेच्या केईएम, सायन रुग्णालयाच्या आवारात औषधांची दुकाने उपलब्ध आहेत. मात्र या दुकानांत जेनेरिक औषधें मिळत नाहीत. याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे आरोग्य समिती अध्यक्षा रोहीणी कांबळे यांनी पत्रव्यवहार करुन पालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांसह सर्वच सर्वसाधारण रुग्णालयात जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याची माहिती कांबळे यांनी दिली.

याबाबत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्याशी नुकतीच एक बैठक संपन्न झाली या बैठकीत पालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांसह १७ सर्वसाधारण रुग्णालयात स्वस्त दरातील जेनेरिक औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांना महागड्या दराची औषधे खरेदी करावी लागणार नाहीत. तसेच स्वस्त दरातील व दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध होतील. यामुळे गरीब रुग्णांना याचा मोठा दिलासा मिळेल, असे कांबळे यांनी सांगितले. पालिकेच्या व्ही.एन.देसाई, वांद्रा येथील भाभा रुग्णालयात या जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. मात्र ज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे, तेथे जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. रुग्णालयांच्या आवारातच जेनेरिक औषधांची दुकाने उघडण्यात येतील, अशी माहिती कांबळे यांनी दिली.

Post Bottom Ad