Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रस्ते घोटाळ्यातील दोषी अधिकाऱयांवर कारवाई होणार


मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या गाजलेल्या रस्ते घोटाळ्यातील दोषी अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र या प्रक्रियेत संबंधित अधिका-यांकडून दिरंगाई केली जात असल्याचे लक्षात आल्यावर आयुक्तांनी या अहवालासाठी मुदत दिली होती. ही मुदत संपली असून हा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. या अहवालात रस्ते विभागातील काही अधिकाऱयांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीड महिन्यापूर्वी पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित अधिका-यांनी मुदत मागीतली होती. या मुदतीत चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून 26 डिसेंबर पर्यंत कारवाईचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आले. मात्र या मुदतीत चौकशी पूर्ण न झाल्यास कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बजावले होते.

मुंबई महापालिकेच्या 234 रस्त्यांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यात दोषी असणा-य़ा कंत्राटदार व अधिका-यांवर दोन टप्प्यात कारवाई करण्य़ाचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 34 रस्त्यांची चौकशी करून त्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्य़ात आली. उर्वरित 200 रस्त्यांच्या चौकशी अहवालातही दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. रस्ते कामांत संबंधित अभियंते, अधिका-य़ांचीही तेवढीच जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचीही चौकशी करून त्यात दोषी आढळणा-या अभियंते, अधिका-यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्य़ावर कारवाई करण्याचा निर्णय़ प्रशासनाने घेतला. या चौकशीची जबाबदारी उपायुक्त रमेश बांबले व चौकशी अधिकारी राजेंद्र रेऴेकर यांना देण्यात आली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटला तरी चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. चौकशी कासवगतीने सुरु असल्याने आयुक्त मेहता यांनी याबाबत बांबळे व रेळेकर यांच्यासोबत गेल्या 10 नोव्हेंबरला बैठक घेऊन चौकशी दिरंगाईबाबत खुलासा मागितला. यावेळी बांबळे व रेळेकर यांनी शहरातील रस्त्यांच्या कामांच्या चौकशीसाठी 22 नोव्हेंबर पर्यंत, पूर्व उपनगरांतील रस्त्यांच्या कामांच्या चौकशीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत तर पश्चिम उपनगरांतील रस्त्यांच्या कामाच्या चौकशीसाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली. या मुदतीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. मुदतीत चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केले होते. तशी बांबळे व रेळेकर यांना पत्राद्वारे समजही देण्यात आली आहे. दरम्यान चौकशी अहवालात काही अधिकाऱयांवर ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र कारवाई काय होणार याबाबत अहवाल सादर केल्यानंतर समजणार आहे. 34 रस्ते कामांमधील 100 दोषींची चौकशी पूर्ण झाली. मात्र अजूनही दुस-या टप्प्यातील 200 रस्त्यांच्या कामांतील 170 दोषींची चौकशी प्रक्रिया अद्याप पूर्ण व्हायची आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom