Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शैक्षणिक वर्ष संपले तरी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब नाहीच


तीनवेळा टेंडर काढूनही कंपन्यांनी फिरवली पाठ
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे वचन आपल्या वचननाम्यातून दिले होते. यानुसार तीन वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावर्षी मात्र या योजनेची वाट लागली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी तीन वेळा निविदा काढल्या. मात्र त्याला कंपन्यांनी प्रतिसाद दिला नसल्याने या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टॅब मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना आहे. तीन वर्षापूर्वी ही योजना सुरू करण्यात आली. पहिल्या वर्षी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांपासून या योजनेला प्रारंभ करण्यात आला. मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश य़ा योजनेमागे आहे. मात्र वर्ष संपायला आले तरी प्रशासन निविदा प्रक्रियेत अडकली आहे. इयत्ता ९ वीचा अभ्यासक्रम बदलल्याने ९ वीतील मुलांचे जुने टँब ८ वीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ९ वीच्या विद्यार्थ्यांना नवीन टॅब खरेदीकरीता निविदा प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत तीनवेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र तीन्हीही निविदांकड़े कंपन्यांनी पाठ फिरवल्याने मागील सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या हातात टॅब मिळालेले नाहीत. टेंडरना प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येऊनही शिक्षण विभागाने यावर अद्याप पर्याय शोधण्याची तसदी घेतलेली नाही. डिसेंबर अखेरपर्यंत टॅब खरेदी करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात होते. मात्र टेंडरला तिस-या वेळीही प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला आहे. सुमारे १३ हजार टॅब खरेदी करण्यास शिक्षण विभागाला अपयश आले आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे तसेच शिक्षण समितीही शिवसेनेच्या ताब्यात आहे. विद्यार्थ्यांना नवीन टॅब मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला सातत्याने दिले. तरीही विद्यार्थ्यांना टॅब देण्यास अपयश येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

आतापर्यंत काढण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. नव्या वर्षात जानेवारीपर्यंत मुलांपर्यंत टॅब पोहचतील असा प्रयत्न केला जाईल.
- शुभदा गुढेकर, शिक्षण समिती अध्यक्षा

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom