Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारपासून बम्बार्डियर लोकल


सीएसएमटी ते कल्याण व बदलापूरपर्यंत १२ फे-या -
मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेच्या ताफ्यात आलेल्या व नव्याने घेण्यात आलेल्या बम्बार्डियर लोकलची पहिली सेवा सोमवार १८ डिसेंबरपासून चालविण्यात येणार आहे. ही लोकल सीएसएमटी ते कल्याणपर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेकडील सिमेन्स गाड्यांपेक्षा बम्बार्डियर लोकल वेगाने धावतात, तसेच बम्बार्डियर गाड्या जास्त हवेशीर असून, गाडीतील आसनाची व्यवस्था उत्तम असल्याने प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्या. त्यापैकी ४० गाड्या मध्य रेल्वेवर आणि ३२ गाड्या पश्चिम रेल्वेवर धावणार होत्या, परंतु मध्य रेल्वेवर डीसी ते एसी असे विजेचे परिवर्तन करावे लागणार होते. त्यामुळे सर्व बम्बार्डियर पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या आणि त्या बदल्यात पश्चिम रेल्वेकडील सिमेन्स लोकल गाड्या मध्य रेल्वेला देण्यात आल्या होत्या, परंतु या प्रशस्त आणि हवेशी बम्बार्डियर गाड्यांना पश्चिम रेल्वेवर प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने, आता बम्बार्डियर मध्य रेल्वेवर चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत ११ आणि एक फेरी बदलापूरपर्यंत चालविली जाईल. सीएसएमटी-कल्याण मार्गावर ताशी १०० किमी आणि त्यापुढे ताशी १०५ किमी वेग असेल. मध्य रेल्वेवर एकूण २४ बम्बार्डियर लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी चार बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील असतील, तर २० बम्बार्डियर लोकल नवीन असतील. इतर लोकल मार्च, २०१८ पर्यंत चेन्नई येथील रेल्वेच्या आयसीएफ कारखान्यातून मध्य रेल्वेकडे येतील असे सांगण्यात येत आहे.

हार्बरने थेट गोरेगाव पर्यंत प्रवास - 
हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे मध्य रेल्वे सीएसएमटी - अंधेरी मार्गावर चालणा-या २५ फे-यांचा विस्तार गोरेगापर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचा लाभ जानेवारी २०१८ पासून प्रवाशांना मिळणार आहे. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी - अंधेरी आणि पनवेल - अंधेरीसाठी १०४ लोकल फे-या धावतात. यात सीएसएमटी-अंधेरी ८६ आणि पनवेल-अंधेरी १८ लोकल फे-यांचा समावेश आहे. यापैकी सीएसएमटी-अंधेरी लोकल फे-यांचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यात येणार आहे. जानेवारी २०१८ मध्ये सुरुवातीला २५ लोकल फे-यांचा विस्तार होणार आहे. त्यानंतर हळूहळू फे-यांची संख्यादेखील वाढवण्यात येणार आहे. विस्तारीकरणामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. भविष्यात गोरेगाववरून थेट पनवेलपर्यंतदेखील लोकल फे-या चालवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom