राज्यातील प्रत्येक गरीब रुग्णावर उपचार होणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2017

राज्यातील प्रत्येक गरीब रुग्णावर उपचार होणार - मुख्यमंत्री


धुळे - उत्तर प्रदेशपाठोपाठ राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या रोगावरील उपचार अत्यंत खर्चिक आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. राज्यातील गरीब, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या रुग्णांवर मुख्यमंत्री आरोग्य कक्ष, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य सेवेच्या माध्यमातून विविध आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. कर्करोगाच्या रुग्णांनादेखील या योजनांतून आर्थिक सुविधा पुरविण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. चक्करबर्डी व बडगुजर प्लॉट,पारोळा रोड परिसरात हे कार्यक्रम झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे,वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मिताताई वाघ, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, निवृत्त पोलिस महासंचालक रामराव वाघ, डॉ. कैलाश शर्मा, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. प्रशांत मंगेशीकर, डॉ. बिना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आराधना भामरे, डॉ. भूषण वाणी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत त्यांचे पुत्र डॉ. राहुल यांनी मोठ्या महानगरातील करिअरचा विचार न करता धुळे येथे सेवा देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे डॉ. राहुल यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात कर्करोगाच्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आढळून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. तंबाखू, गुटखा सेवनाने हे प्रमाण वाढत आहे. अलिकडे केलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत शाळेतील काही विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून आली आहेत. या रोगामुळे रुग्णाला त्रास होतोच. त्याबरोबरच त्याच्या कुटुंबाचीही फरफट होते. याबाबत मुंबईतील टाटा मेमोरिअल इस्पितळाचे कार्य महान आहे. मात्र, मुंबईत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टाळण्यासाठी टाटा इस्पितळात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार सोयीसुविधा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे खानदेश कॅन्सर सेंटर प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र कार्यान्वित झाले, तर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच फायदा होईल.

वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन म्हणाले, कर्करोगाच्या रुग्णांना होणारा त्रास पाहिला जात नाही. तंबाखू, गुटख्याचे सेवन कर्करोगाला निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी उपचारापूर्वीच काळजी घेतलेली केव्हाही चांगलेच. अशा रुग्णांवर कमीत कमी खर्चात आणि सामाजिक बांधिलकीतून खानदेश कॅन्सर सेंटरमध्ये उपचार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यटनमंत्री रावल म्हणाले, कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी जगातील अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज रुग्णालये स्थापन करण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर येथे रुग्णालयाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. सुलवाडे-जामफळ योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 40 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 102 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, 30 वर्षांपूर्वी मुंबई सोडून धुळ्यात रुग्ण सेवेला सुरवात केली. त्यानंतर मुलगा डॉ. राहुल यांनी रुग्णसेवेचा वसा घेतला आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचार खर्चिक व दीर्घकालिन असतात. त्यामुळे कर्करोगाविषयी समाजात जनजागृती वाढली पाहिजे. त्यासाठी कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

डॉ. कैलाश शर्मा यांनी सांगितले, देशात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यासाठी टाटा मेमोरिअल आधार असला तरी रुग्ण व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रुग्णालयात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण सोयीसुविधा, उपचार देशभरात मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी खानदेश कॅन्सर सेंटरसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतील. त्यांना टाटा मेमोरिअल, अणुऊर्जा विभाग सहकार्य करेल. डॉ. राहुल भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Post Bottom Ad