फायर ऑडिटचे अहवाल जाहीर करण्याची नगरसेवकांची मागणी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2017

फायर ऑडिटचे अहवाल जाहीर करण्याची नगरसेवकांची मागणी


झवेरी बाजार व साकीनाका दुर्घटनेतील मृतांना सभागृहाची श्रद्धांजली -
मुंबई । प्रतिनिधी - झवेरी बाजार दुर्घटनेत व साकीनाका येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्याना श्रद्धांजली वाहून पालिका सभागृह तहकूब करण्यात आले. या दुर्घटनेनंतर नगरसेवकांनी फायर ऑडिटबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून फायर ऑडिटचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या झवेरी बाजार येथील एका म्हाडाच्या सेझ इमारतीचा काही भाग कोसळून चार जणांचा मृत्त्यू झाला होता. तसेच सोमवारी पहाटे साकीनाका येथे भानू फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनेमधील मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिल्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोणतेही कामकाज न करता सभागृह तहकूब केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी तीन वर्षांपूर्वी कुर्ला येथील किनारा हॉटेलला आग लागली होती. या आगीमध्ये तीन विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पालिकेने फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. फायर ऑडिट करण्यात आले मात्र याचा अहवाल गेल्या तीन वर्षात सादर करण्यात आलेला नाही. हा अहवाल लवकरात लवकर सभागृहात सादर करावा अशी मागणी केली. यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत प्रशासनाने नोंद घेण्याचे आदेश दिले.

प्रभागात अग्निशमन दल असावे - 
मुंबईत आगीच्या घटना नेहमीच घडतात. मात्र अग्निशमन केंद्र जवळ नसल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता येत नाही. यामुळे पालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अग्निशमन दल केंद्र उभारावे. कुर्ल्याच्या किनारा हॉटेल आगीचा अहवाल गेल्या तीन वर्षात सादर करण्यात आलेला नाही. हा अहवाल पालिका सभागृहात त्वरित सादर करावा. आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट करणे बांधकारक आहे. असे फायर ऑडिट सर्वाना करण्याची सक्ती करण्यात यावी. 
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते

बिट मार्शल प्रमाणे अग्निशमन केंद्र असावे -
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चिंचोळे रस्ते आहेत. अश्या ठिकाणी आगी लागल्यास त्या ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचणे अडचणीचे होते. अश्या चिंचोळ्या ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचता यावे म्हणून पोलिसांच्या बिट मार्शल प्रमाणे मोटर सायकल देण्याची मागणी केली होती. या मागणी प्रमाणे ठाण्यात मोटार सायकलवर अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यास जातात. त्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र अशी मागणी ज्या मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आली त्या महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. 
- डॉ. सईदा खान, नगरसेविका, राष्ट्रवादी

Post Bottom Ad