अग्निशमन दलात आग विझवणारा रोबो दाखल होणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2017

अग्निशमन दलात आग विझवणारा रोबो दाखल होणार


मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत वर्दळीच्या ठिकाणी आग लागल्यास त्या आगीमध्ये थेट उडी घेऊन आगीवर नियंत्रण मिळवणारा हायटेक रोबो नव्या वर्षात जून किंवा जुलैमध्ये अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. आगीमध्ये ज्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना पोहचता येणार नाही अशा ठिकाणी हा रोबो जाऊन आग विझवणार आहे. या रोबोवर संगणकाच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले जाणार असल्याने अग्निशमन अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागणार नाही.

सद्या मुंबईत सातत्याने आगीच्या घटनां घडत आहेत. दलाचे जवान यांमध्ये कायम व्यस्त असतात. वर्दळीचे ठिकाण, अरुंद गल्ल्या, आणि त्यामुळे काही क्षणात भ़डकणा-या आगीवर अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून नियंत्रण मिळवतात. नव्या वर्षात अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी अनेक महत्वपूर्व योजना राबवल्या जाणार आहेत. आगीचा भडका आणि चटक्यांपासून बचाव करण्यासाठी थ्री-लेयर हायटेक सूट आणल्यानंतर आगीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवेश करून आग विझवण्याची यंत्रणा घेऊन जाणारा रोबो आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच जवान रोबोसह घटनास्थळी दाखल होतील. जवान आग विझवण्याचे काम करताना भडकलेली आग, चिंचोळ्या गल्ल्या, बेसमेंट, धुराच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश कॉम्प्युटरच्या माध्यमातून रोबोटला देण्यात येतील. प्राथमिक तत्त्वावर एक रोबो आणण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जून-- जुलै 2018 मध्ये आग विझवणारा रोबो दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रोबोमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. यासाठी परदेशी तज्ज्ञ कंपन्यांची टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. रोबोचा दर्जा आणि टेक्नॉलॉजीची तपासणीही आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे.

रोबोची मदत फायदेशीर - 
मुंबईत अनेक ठिकाणे वर्दळीची आहेत. अरुंद, चिंचोळ्या गल्ल्या किंवा अडगळीच्या ठिकाणी आग विझवण्यास जवानांना पोहोचणे कठीण होते. त्यामुळे आग तातडीने भडकण्याची शक्यता असते. अशा वेळी रोबोची मदत फायदेशीर ठरणार आहे. 
- प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी, मुंबई

Post Bottom Ad