रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाहनांना रुग्णालय परिसरात पार्किंगला मनाई - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2017

रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाहनांना रुग्णालय परिसरात पार्किंगला मनाई


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसर व रुग्णालयाबाहेर त्यांची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या वाहनतळ धोरणात रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर वा कोठेही वाहन पार्किंगला मनाई असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोफत वाहन पार्किंगचा तर प्रश्नच उदभवत नसल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. 
मुंबई महापालिकेच्या अधिकृत वाहनतळाच्या ठिकाणीच वाहन पार्क करता येणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या वाहनतळ धोरणानुसार रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असल्याचे पालिका रस्ते व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच, रुग्णालय परिसरात पालिकेची सशुल्क वाहन पार्किंगची व्यवस्था असेल तर अशा ठिकाणी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक वाहन पार्क करू शकतील ; मात्र मोफत पार्कींग करता येणार नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईतील कोणत्याही खाजगी, पालिका व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल करण्यासाठी व त्या दाखल रुग्णाला पाहण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना रुग्णालयात , रुग्णालयाबाहेर रुग्णालयाच्या आवारात, रस्त्यावर वाहन पार्क करण्यास मनाई असून तसे वाहन पार्क केले तर ते वाहतूक पोलीस कारवाई करून अशी वाहने उचलून घेऊन जातात . शिवाय अशा वाहनांना दंड आकारला जातो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनःस्ताप होतो, त्यांची मोठी धावपळ होते. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरील रस्त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत वाहन पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ९ ऑक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन नगरसेवक श्रीकांत कवठणकर यांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अभिप्राय दिला आहे. यामध्ये रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांना वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात आल्याचे नमूद आहे.

Post Bottom Ad