Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कमला मिल दुर्घटनेचे स्थायी समितीत तीव्र पडसाद


सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरात लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले. पालिका आयुक्तांनी केलेल्या निवेदनात पाच अधिकाऱ्यांना निलंबित तर सहाय्यक आयुक्तांची बदली केल्याचे जाहीर केल्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी सहाय्यक आयुक्तांनाही निलंबित करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून केवळ खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. त्या विभागातील जबाबदार सहाय्यक आयुक्तांची केवळ बदली करून सुटका करणे योग्य नसल्याचे सदस्यांनी सांगितले. या घटनेला सहाय्यक आयुक्तही जबाबदार असल्याने त्यांनाही निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सर्वच पक्षिय सदस्यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी या घटनेला सहाय्यक आयुक्त जबाबदार असल्याने त्यांनाही निलंबित करावे असे निर्देश प्रशासनाला दिले.

कमला मिलमधील आगीबाबत स्थायी समितीत बोलताना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे समर्थन करताना त्या विभागातील सहाय्यक आयुक्तांनाही निलंबित करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी ज्यांचे जीव गेले त्यांच्या जीवाची भरपाई होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कमला मिल परिसरात चेंज ऑफ युजर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली आहेत. यामध्ये सुमारे २५० ते ३०० पब व हॉटेल असल्याचे ते म्हणाले. या सर्व बांधकामास पालिकेच्या विधी खात्याचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. तर समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी आयुक्तांनी प्रथमच ग्राउंड लेव्हलवर कारवाई न करता विधी अधिकाऱ्यावर, इमारत व कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. अशा दुर्घटनेला सहाय्यक आयुक्त जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दुर्घटनेनंतर पालिका जागी होते आणि नोटीस देते. या नोटीस केवळ संबंधितांना संरक्षणासाठी दिल्या जात आहेत का असा प्रश्न उपस्थित करत दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी पालिकेवरील मुंबईकरांचा भरोसा उडाला असल्याचा आरोप यावेळी केला. पालिकेने पबला नोटीस दिल्यानंतर सिल का गेले नाही असा प्रश्न उपस्थित करत दुर्घटनेस इमारत व प्रस्ताव विभागही जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. कमला मील परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे असताना त्यांना पालिकेने ओसी कशी दिली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासन संवेदनाहीन झाल्याचा आरोप केला. आयुक्तांचा भ्रष्टाचारात लढा एकाकी आहे का, असा प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचारापुढे नवीन पदे निर्माण केली तरी काहीही फायदा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. १५ - २० हजारात पालिका अधिकारी विकले जात असून ते मुंबईकरांच्या मृत्यूचा सौदा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मुंबई पालिकेने सर्व उपाययोजना करूनही हॉटेल आणि पब मालकांकडून काळजी न घेतल्याने अशा दुर्घटना घडतात. पालिकेचे विधी खाते सर्वात भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर अधिकाऱ्याच्या निलंबनाबरोबरच सहाय्यक आयुक्तांनाही निलंबित करावे. तसेच या प्रकरणी संबंधित सहाय्यक आयुक्त उपायुक्तांच्या वेतनवाढ रोखावी, त्यांच्याकडून आर्थिक दंड वसूल करावा, त्यांच्या गोपनीय अहवालात त्याची नोंद करावी अशा सूचना जाधव यांनी केल्या.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom