कमला मिल परिसरातील आगीत १४ जणांचा मृत्यू, ५५ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

कमला मिल परिसरातील आगीत १४ जणांचा मृत्यू, ५५ जखमी


टेरेसवरील रेस्टॉरेंट्स, पबच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पब, रेस्टॉरेंटच्या मालकावर गुन्हा दाखल 
मुंबई । प्रतिनिधी - लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीला रात्री लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोजोस पबमध्ये पार्टी सुरू असताना आग लागल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत्यूमुखींमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे टेरेसवरील रेस्टॉरेंट्स आणि पबच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पब आणि रेस्टॉरेंटच्या मालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार लोअर परेल येथील दीपक टॉकीज जवळ ट्रेड हाऊस चार माजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री १२.३० दरम्यान आग लागली. सदर आग पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी आटोक्यात आली असली तरी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी संपूर्ण आग विझवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले आहे. आग वरच्या मजल्यावर पसरत गेली. याच इमारतीच्या टेरेसवर रेस्टॉरेंट आणि पब देखील आहे. त्यात या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबुचे बांधकाम होते. त्यामुळे आग आणखी वाढत गेली. आग इतकी भीषण होती की टेरेसवर बांधण्यात आलेलं बांबू आणि प्लास्टिकचं छप्पर जळून खाक झालं. सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग आणखी पसरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ११ महिलांचा तर ३ पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ५५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ३० पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. ऐरोली बर्न रुग्णालयात १, भाटिया रुग्णालयात १३ असे १४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ४१ जणांवर उपचार करून सोडून देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांमध्ये पबमध्ये आलेल्या तरुण-तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. घटनास्थळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, महापालिका जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, आशिष शेलार इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

प्रसारमाध्यमांनाही आगीची झळ - 
कमला मिल परिसरात अनेक प्रसारमाध्यमांची कार्यालये आहेत. यात टाईम्स नाऊ, टीव्ही 9, झूम टीव्ही आणि रेडिओ मिर्ची यांचा समावेश आहेत. आग इतकी भीषण होती की, प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांमधील फायर अलार्म वाजला. त्यानंतर इथली सर्व कार्यालये रिकामी करण्यात आली. टाईम्स नाऊ, मिरर नाऊच्या कार्यालयामध्ये धूर पसरला होता. या आगीत आजूबाजूच्या अनेक कार्यालयांचं नुकसान झालं आहे. यामुळे टाईम्स चॅनल्सचे ब्रॉडकास्टिंग थांबवण्यात आलं होत.

पब, रेस्टॉरेंटच्या मालकावर गुन्हा दाखल - 
कमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला आग लागली होती. या प्रकरणी मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व इमारतींचे ऑडिट केले जाईल -
कमला मिल कंपाऊंडमधील सर्व इमातींचे फायर ऑडिट केले जाईल. या दुर्घटनेतील संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करा -
कमला मिल कंपाऊंडमध्ये आग लागल्यानंतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात परंतु अशा घटनांमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांवरही कारवाई व्हायला हवी तसेच त्यांच्या बढत्या रोखायला हव्यात.
- यशवंत जाधव, सभागृह नेते

एमआरटीपी अंतर्गत कारवाई करा -
कमला मिल कंपाऊंडमध्ये २५ ते २६ रेस्टोरन्ट अनधिकृत आहेत. व्हिक्टोरिया मिल कमला मिलमध्ये ज्या रेस्टोरंटला परवाने नाहीत ते तात्काळ बंद करण्यात यावेत. कमला मिल कंपाऊंडमध्ये आज आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला याबाबत एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात यावी
- रवी राजा, विरोधी पक्षनेते

मृतांची नावे - 
प्रीती रोजनी ४९, तेजल गांधी ३६, प्राची खेतानी ३१, प्रमिला केणी २८, किंजल शाह २८, कविता गोऱ्हानी ३६, पारुल ४५, मनिषा शाह ३०, याशा ठक्कर २८, शेफाली दोषी ४५, खुशबु २८, सरबजीत परेरा २४, विरवा ललानी २३, धैर्या लखानी २६

Post Bottom Ad