साकीनाक्यात फरसाणच्या दुकानाला आग - 12 जणांचा मृत्यू, एक जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2017

साकीनाक्यात फरसाणच्या दुकानाला आग - 12 जणांचा मृत्यू, एक जखमी


मुंबई | प्रतिनिधी - अंधेरी पूर्व साकीनाका परिसरात खैरानी रोडवर भानू फरसाणच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून एका जखमी व्यक्तीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कंपाऊंडमध्ये भानू फरसाण नावाचे दुकान आहे. या दुकानाला (गाळा नंबर-१) पहाटे ४ वाजून १६ मिनिटांनी भीषण आग लागली. या कंपाऊंडमध्ये वेल्डिंगची दुकाने आहेत. बहुतेक दुकाने लाकडी असल्याने आगींने लगेच पेट घेतला. पहाटेच्या वाऱ्यामुळे ही आग आणखीनच भडकली. ही आग इतकी भीषण होती की, कामगारांना त्यांचा जीवही वाचविता आला नाही. चोहोबाजुंनी आगीचे तांडव झाल्याने या कामगारांना बाहेर पडता आले नाही. आग लागली तेव्हा फरसाणच्या दुकानासह बाजूच्या दुकानातील कामगार झोपेत होते. या आगीमुळे दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले असून दुकानाचा काही भाग कोसळल्याने आगीत आणि ढिगाऱ्याखाली जवळपास १५ कामगार अडकले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला ४.३८ वाजता सदर आग आटोक्यात आणण्यास यश आले. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळावरून १२ जणांना बाहेर काढले असून त्यांना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पाठवले असता रुग्णालय प्रशासनाने वसीम सलीम मिरझा, भोला, लल्लू (नेपाली), सल्लूभाई / मनोहर पंडित, राजू यादव, लंबू, नईम मिरझा, राम गुप्ता, गुलाम, जितेंन्द्र या १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहीत दिली आहे. १२ मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. या दुर्घटनेमधून अखिलेश रामकिशोर तिवारी (२५) हा आग लागली त्यावेळी उडी मारून पळाल्याने वाचला तरी त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात सुरु आहेत.

Post Bottom Ad