Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

भीम सैनिकांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची सभा उधळली


औरंगाबाद - दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांनी माझ्या पक्षात यावे, अशा प्रकारची वक्तव्ये केल्यामुळे संतापलेल्या भीम सैनिकांनी रामदास आठवले यांच्या सभेत आठवले चले जाव, भाषणबाजी बंद करा, तुमच्यामुळेच भीमा-कोरेगावची घटना चिघळली, अशा घोषणा देत खुर्च्यांची मोडतोड करीत आठवले यांची सभा उधळली. यावेळी भीम सैनिकांनी आठवले यांना सभेच्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकणी १५० हून अधिक भीम सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आठवले यांना आपले भाषण चार ते पाच मिनिटात पूर्ण करावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन सोहळ्याचा कार्यक्रमप्रसंगी रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नामविस्तार वर्धापनदिन सोहळा एकाच व्यासपीठावरून साजरा करण्यासाठी रिपाइंचे विविध पक्ष, संघटनांनी एक व्यासपीठ उभारले होते. या व्यासपीठावर न येता आठवले यांनी त्यांच्या पक्षाने उभारलेल्या व्यासपीठावर गेले. ही बाब खटकली. याच दरम्यान आठवेल भाषण करताना तळागाळातील समाजामध्ये ऐक्य होण्याची गरज आहे. त्यात गटबाजी होता कामा नये, ऐक्याचा फॉम्युला सर्वानुमते ठरवणे गरजेचे आहे. हे ऐक्य माझे मंत्रीपद घालवण्यासाठी असेल तर मात्र मला असे ऐक्य मान्य नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी आठवले यांनी दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांनी माझ्या पक्षात यावे असे आवाहन करताच भीम सैनिकांचा बांध फुटला. शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यापैकी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी सुरू केली. यामुळे मात्र काही काळ या कार्यक्रमात व्यत्यय आला होता. वारंवार आवाहन करूनही घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीसांनी घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर आठवले यांनी केवळ चार मिनिटांत आपले भाषण आटोपते घेत काढता पाय घेतला. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करणा-या १०० ते १५० कार्यकर्त्यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यानंतर माननीय मंत्रीमहोदयांची सभा व्यवस्थित पार पडली. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त कोडे यांनी दिली.

प्रकाश आंबेडकरांनी राजा व्हावे, मी सरदार – आठवले
भीमा कोरेगाव घटनेनंतर महाराष्ट्र बंदपासून प्रकाश आंबेडकर चर्चेत आले आणि मी बॅकफुटवर गेलो अशी चर्चा असली तरी मला फ्रंटफुटवर कसे यायचे हे कळते, असा टोला रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. दलित चळवळीत आपण कालही राजा होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार असून बाकीचे सगळे प्रसारमाध्यमांनी तयार केलेले कागदी वाघ आहेत, अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली होती. याबाबत बोलताना समजामध्ये ऐक्याची भावना पुढे येत असून प्रकाश आंबेडकरांशिवाय ते शक्य नसल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी राजा व्हावे, मी सरदार व्हायला तयार असल्याचे आठवले म्हणाले.

आठवलेंसाठी पहिल्यांदाच सुरक्षा यंत्रणा - 
भीम कोरेगावच्या घटनेनंतर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात भीम सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आठवले यांच्या सभेत गोंधळ होऊ शकतो यांची कल्पना पोलिसांना आणि आठवले यांच्या कार्यकर्त्यांना होती. यामुळे २६ वर्षात पहिल्यांदाच आठवले यांच्या सुरक्षेसाठी सभेच्या ठिकाणी डी, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दीवर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरिकेड्स बांधण्यात आले होते. 

सर्वपक्षीय सभा गोंधळाविना संपन्न -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन सोहळ्याचा कार्यक्रमप्रसंगी रामदास आठवले वगळता सर्व पक्ष संघटना ‘एक विचार एक मंच’ नावाखाली एकत्र आल्या होत्या. या विचारमंचावर सर्व पक्ष संघटनांच्या व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांनी समाजाचे ऐक्य घडविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला ही बाब कौतुकास्पद असली तरी हे ऐक्य कायमस्वरूपी टिकविण्यासाठी मंचावरील सर्वच नेत्यांना पायात भिंगरी घालून फिरावे लागेल तरच हे ऐक्य यशस्वी होईल, असा सूर काढला. विशेष म्हणजे, प्रत्येक वक्ता अतिशय मोजकेच बोलत होता. अचूक बोलत होता आणि प्रचंड गर्दी असून केवळ टाळय़ांसाठी हात वर उठत होते. सर्व पक्ष संघटना एकत्र आल्या असल्या तरी कोणत्याही प्रकारच्या गोंधळाविना सभा संपन्न झाली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom