Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'महाराष्ट्र बंद' मागे


मुंबई - भीमा कोरेगाव येथे सणसवाडीत भीम सैनिकांवर झालेल्या दगडफेकीच्या व त्यांच्या गाड्या तोडल्याचा निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. भारिपने पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला. या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, असा दावा आंबेडकर यांनी केला.

पत्रकार परिषदे दरम्यान भीमा कोरेगाव हिंसेला जबाबदार असलेले शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत, असेही आंबेडकर यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अराजक माजवण्याचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे अराजकाचं राज्य हवं की शांततेचं राज्य हवं, याचा निर्णय तुम्ही आम्ही घ्यायचा आहे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

याकूबचा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी स्फोट घडवण्यामागे त्याचा हात होता. त्यामुळे त्याला सुप्रीम कोर्टाने ३०२ कलमाखाली दोषी ठरवले. याच न्यायाने भीमा कोरेगाव जवळील सणसवाडीत झालेल्या हिंसेचे पडद्यामागील सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

आम्ही पुकारलेला बंद आम्ही मागे घेतला आहे. मी आतापर्यंत नियंत्रण ठेवून शांतता भंग होऊ दिली नाही मात्र आता माझी जबाबदारी संपली आहे. भीमा कोरेगाव येथील हिंसेच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटना एकत्र आल्या होत्या मात्र या सगळ्याच संघटना आमच्या हातात नाहीत. त्यामुळे मी बंद मागे घेतल्यानंतर या अन्य संघटना माझं ऐकतील याची शाश्वती देता येणार नाही. तेव्हा महाराष्ट्रात यापुढे शांतता राखण्याची जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांची आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom