सैन्य दलाने आंबिवली पुलाचा गर्डर ९ मिनिटात उभारला - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 January 2018

सैन्य दलाने आंबिवली पुलाचा गर्डर ९ मिनिटात उभारला


मुंबई - एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर एल्फिस्टन, आंबिवली व करीरोड या स्थानकात भारतीय सैन्यदलाकडून पूल बांधण्याचे जाहीर करण्यात आले. एल्फिस्टन स्थानकातील पुल तयार झाला आहे. आंबिवली स्थानकातील पुल कधी उभा राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आंबिवली स्थानकातील पुलाचा गर्डर सैन्यदलाच्या जवानांनी अवघ्या नऊ मिनिटांत उभारल्याने अर्ध्या तासात पुल उभा करण्यात आला.

मध्य रेल्वेच्या आंबिवली स्थानकात कसा-याच्या दिशेला भारतीय सैन्यदलाकडून पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पादचारी पुलाची लांबी १८.२९ मीटर, तर रुंदी ५ मीटर आहे. तसेच हा पूल २५ टन वजनाचा आहे. पुलावरील गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूंना जिने बांधण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत हा पूल प्रवाशांसाठी खुला करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. आंबिवली स्थानकात या पुलाचे गर्डर उभारण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत कल्याण ते आसनगावदरम्यान मेगाब्लॉक घेतला. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रथम ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर सकाळी १०.४५ च्या दरम्यान जवानांनी क्रेनच्या मदतीने अवघ्या नऊ मिनिटांत पुलाचे गर्डर उभारले. दुपारी ३ वाजता कल्याण ते आसनगावदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू झाली. २० नोव्हेंबरपासून या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. ३९ जवान या पुलाचे काम करत आहेत. सैन्य दलाला रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मदत करत आहेत. जवानांनी गुरुवारी या पुलाचे गर्डर अवघ्या नऊ मिनिटांत उभारले, व जवळपास अर्ध्या तासात पुल उभा करण्यात आला. सैन्य दलाला दिलेले मिशन पूर्ण झाल्याने जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत याचा आनंद व्यक्त केला.

Post Top Ad

test
test