दोन दिवसांत ६५० हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2018

दोन दिवसांत ६५० हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई


१४ आस्थापनांना टाळे, ६८ बांधकामांवर तोडक कारवाई -
मुंबई । प्रतिनिधी - ‘साकीनाका’ आणि ‘कमला मिल’ आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम केलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर सोमवारपासून पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवार, मंगळवार या दोन दिवसात तब्बल ६५० हॉटेलची पाहणी करत अग्नी प्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या १४ हॉटेलना टाळे ठोकण्यात आले आहे. तर ६८ ठिकाणी बेकायदा बांधकामे तोडून टाकण्यात आली आहेत. तसेच या कारवाई दरम्यान २०० आस्थापनांना कारवाई करण्यापूर्वी एक संधी देण्यात आली आहे. यानंतर मात्र या आस्थापनांना नोटीस न देता कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

साकीनाका येथे १८ डिसेंबरला भानू फरसाण कारखानामध्ये लागलेल्या आगीत १२ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यानंतर प्रशासनाने हॉटेल आणि गृहनिर्माण सोसायट्यांना एका महिन्यात आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. यावेळी मुदतीनंतरही अमलबजावणी न झाल्यास कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २९ डिसेंबरला ‘कमला मिल’ दुर्घटनेत १४ जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दोन दिवस जोरदार कारवाई करीत तब्बल १२४० हॉटेल, रेस्टॉरंट, पब, क्लब, जिमखाने आदींची तपासणी केली. या कारवाईत ६७१ बेकायदा बांधकामे जमिदोस्त केली. ३७ हॉलटेला टाळे ठोकण्यात आले. तर ८४३ सिलिंडर्स जप्त करण्यात आले. यावेळी व्यावसायिकांना आगप्रतिबंधक यंत्रणा सुरू करणे आणि बेकायदा बांधकामे स्वत:हून तोडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवारी ८ व ९ जानेवारी रोजी पालिकेने धडक कारवाईला सुरुवात केली. या कारवाई दरम्यान, आग प्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या आणि बेकायदा बांधकामांना दणका दिला आहे. या कारवाईसाठी अधिका-यांची विशेष टीम तयार करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत मुंबईत झालेल्या आगीच्या घटनांमध्ये बेकायदेशीर कामांमुळेच जीवित आणि वित्तहानी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेकडून कारवाईसाठी २४ विभागांमध्ये स्पेशल टीमच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. या टीममध्ये पालिका अधिकारी, अग्निशमन अधिकार्‍यांचा समावेश आहे. या टीमच्या माध्यमातून विविध व्यवसाय, आस्थापनांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून कारवाई केली जात आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती, उपआयुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली.

Post Bottom Ad