भीमा-कोरेगाव घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2018

भीमा-कोरेगाव घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करणार - मुख्यमंत्री


मृत व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाखांची मदत -
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. त्यांनी कधीच जातीयतेला खतपाणी घातले नाही. सोमवारी पेरणीफाटा (ता. हवेली) भीमा-कोरेगाव दगडफेकीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा संपूर्ण तपास हा उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान न्यायाधीशांमार्फत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला १० लाखांची तातडीची मदतही जाहीर केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोमवारी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी सुमारे तीन लाख जनता आली होती. काही सामाजिक संघटनेने विविध इशारे दिल्याने पोलिसांच्या सहा कंपन्या नेमून संपूर्ण पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दंगल घडावी यासाठी काहीजणांकडून प्रयत्न होत होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न होऊ दिले नाहीत. सोमवारी रात्रीच सर्व नागरिकांना पोलिसांनी वाहनाने सुखरूप घरी पोहोचविले आहे. काही ठिकाणी गाड्या जाळण्याचे व दगडफेकीचे प्रकार घडले, मात्र पोलिसांनी सर्व स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. या घटनेत सामील असणाऱ्यांवर जाती-धर्माचा व विचारांचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

घटनेच्या ठिकाणी एका युवकाचा मृतदेह सापडला असून ही हत्या समजून राज्य सरकार याची सीआयडीमार्फत चौकशी करणार आहे. हत्या झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना तातडीची दहा लाख रूपयांची मदत शासन देणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जनतेला शांततेचे आवाहन -
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महापुरूषांना मानणाऱ्यांनी अशा घटना होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शिवाय जनतेने व राजकीय पक्षांनी समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका -
मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या घटनेवर संयम दाखविला, यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. समाज माध्यमातून (सोशल मीडिया) काहीजण आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय तेढ निर्माण करीत आहेत. अशा अफवांवरही जनतेने विश्वास ठेवू नये, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Post Bottom Ad