भीमा-कोरेगाव घटनेचे महाराष्ट्रात पडसाद - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

02 January 2018

भीमा-कोरेगाव घटनेचे महाराष्ट्रात पडसाद


मुंबई । प्रतिनिधी - १ जानेवारीला भीमा-कोरेगावच्या विजयदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांच्या गाड्यांवर दगडफेक करत काही गाड्या जाळण्यात आल्या. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले आहे. ठिकठिकाणी बंद पाळत रास्तारोको आणि दगडफेक करण्यात आली. तर मुंबईच्या चेंबूर गोवंडी स्थानकादरम्यान रेलरोको करण्यात आला. यादरम्यान १०० हून अधिक आंदोलकांना विविध ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलना दरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत महामंडळाच्या १३४ एसटीचे नुकसान झाले असून मुंबईत बेस्टच्या २० गाड्या विविध ठिकाणी फोडण्यात आल्या.

१ जानेवारीला भीमा कोरेगांव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक जमतात. भीमा कोरेगांवकडे भीम अनुयायी निघाले असतानाच त्यांच्यावर एका समुदायाकडून कोरेगांव जवळ दगडफेक करण्यात आली. तसेच काही गाड्या जाळण्यात आल्या. या हिंसाचाराचे मुंबईसह महाराष्ट्रात आज हिंसक पडसाद उमटले. मुंबईमधील चेंबूरच्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला. चेंबूर नाका येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चेंबूर नाका येथे कडकडीत बंद पाळला. अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत बेस्ट बसेससह अनेक वाहनांची तोडफोड केली. चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी, कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडूप आदी भागातही पसरले आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून मार्ग रोखून धरला. घाटकोपर येथील असल्फा आणि रमाबाई नगर येथे कडकतीत बंद पाळण्यात आला. रमाबाई नगर जवळील हायवे भीम सैनिकांनी रोखून धरला होता.

महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. पुणे सासवड मार्गावर भेकराईनगरला पीएमपीएल व एस.टी बसमध्ये प्रवासी प्रवास करीत असताना दगडफेक केली व काचा फोडल्या. राहता शहरात तीन बसेसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसमधील तिन प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिकमधील देवळाली तसेच मनमाड येथे शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. भीमा कोरेगाव ते पेरणे फाटय़ादरम्यान १ जानेवारीला भीम सैनिकांच्या वाहनांवर दगडफेक करत जाळपोळही केली होती. त्यात ४० हून अधिक कार आणि इतर वाहनांचे नुकसान झाले. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत असताना कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. आज या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मंत्रालयातही आंदोलन - 
भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मंगळवारी दिवसअखेर मंत्रालयात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करीत हातात सरकार आणि मुख्यमंत्र्यांचे फलक उंचावत निदर्शने केली. ही निदर्शने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर केली. सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दलित विरोधी मुख्यमंत्री चले जाव, मुख्यमंत्री मुर्दाबाद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. घोषणा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांना बंदोबस्तासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आंदोलनकर्त्या युवकांना मारिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला घेऊन गेले.

मुंबईत २० बसेसची तोडफोड -
पुणे येथे भीमा कोरेगांव येथे भीम सैनिकांवर एका समुदायाकडून दगडफेक करण्यात आली. याचे पडसाद मुंबईत १ जानेवारीच्या रात्रीपासून उमटू लागले आहे. एका जानेवारीच्या रात्री मुंबईत ठिकठिकाणी भीमाँ कोरेगांव घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी काही ठिकाणी बंद पाळण्यात आला, काही ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. यादरम्यान बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी दरम्यान १ जानेवारीला आणिक आगार, मुलुंड, देवनार येथे ३ तर २ जानेवारीला देवनार, मरोळ, मुंबई सेंट्रल, घाटकोपर, वरळी, मुलुंड, शिवाजी नगर, बांद्रा या ठिकाणी १७ बसेस तोडण्यात आल्या आहेत. या सर्व बसेसच्या काचा फुटल्या असून त्यामुळे बेस्टचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हार्बर मार्गावर रेलरोको -
भीमा कोरेगांव घटनेचा निषेध करत भीम अनुयायी दुपारी १२.१० च्या दरम्यान आंबेडकरी अनुयायी चेंबूर रेल्वे मार्गावर उतरले आणि त्यांनी सीएसटी-बेलापूर-८ ही रेल्वे रोखून धरली. त्यानंतर येथे दगडफेकीचे तुरळक प्रकारही घडले. या रेल रोकोमुळे कुर्ला ते मानखुर्द वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी वाहतूक सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. या रेलरोको दरम्यान सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यानची वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. दरम्यान चेंबूर आणि मानखुर्द रेल्वे स्थानकात आंदोलकांनी रेलरोको केल्यामुळे काही काळ हार्बर रेल्वे ठप्प झाली. तर मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे सुरळीत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कुर्ला आणि मानखुर्द ते वाशी-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

Post Top Ad

test
test