पालिका सभागृहात तब्बल 17 वर्षांनी महापुरुषांची तैलचित्रे लागणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 January 2018

पालिका सभागृहात तब्बल 17 वर्षांनी महापुरुषांची तैलचित्रे लागणार


9 तैलचित्रांसाठी 47 लाख 25 हजार रुपये खर्च केले जाणार -
मुंबई । प्रतिनिधी -मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहाला १३ जानेवारी २००० साली आग लागली होती. या आगीमध्ये पालिका सभागृहातील ११ पैकी ९ महापुरुषांची तैलचित्रे जळाली होती. ही तैलचित्रे पालिका सभागृहात पुन्हा लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी होणाऱ्या खर्चाला मंजुरी मिळावी यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या विधी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. विधी समिती व स्थायी समितीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तब्बल १७ वर्षांनंतर पालिका सभागृहात ९ महापुरुषांची तैलचित्रे लावली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची इमारत ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर व्हीकटोरीयन वास्तुशैलीत उत्कृष्ट कारागिरी असलेले सभागृह आहे. या सभागृहात २४७ जणांच्या बैठकीची सोया करण्यात आली आहे. यामध्ये २३२ नगरसेवक तर १५ जागा अधिकारी आणि पत्रकारांसाठी राखीव आहेत. याच सभागृहात विविध नेत्यांचे १३ पुतळे असून ११ विविध नेत्यांची तैलचित्रे लावण्यात आली होती. यात विठ्ठल ना. चंदावरकर, जहांगीर वी. बोमन बेहराम, सदाशिव कानोजी पाटील, विठ्ठलभाई जवेरभाई पटेल, इब्राहिम रहिमतुल्ला, सर फिरोजशाह मेरवानजी मेहता, दिनशा रदुलजी वाच्छा, जगन्नाथ शंकरशेठ, युसूफ जे. मेहर अली, खुरशेद फ्रामजी नरिमन, मोरेश्वर वासुदेव दोंदे यां महापुरुषांचा समावेश आहे.

महापालिका सभागृहाला आग लागल्यानंतर सभागृहातील नक्षीदार तावदाने, रंगकाम, लाकडी उपस्कर, तैलचित्रे, पुतळे इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सभागृहाच्या दुरुस्ती व पुनःस्थापना करण्याकरिता मे. इटॅक या तज्ञ् संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेने केलेल्या कामाला २००१ साली 'अर्बन हेरिटेज अवॉर्ड' मिळाले होते. पालिका सभागृहातील ११ पैकी जगन्नाथ शंकरशेट व मोरेश्वर वासुदेव दोंदे या दोन महापुरुषांची तैलचित्रे लावण्यास पालिकेला यश आले. इतर ९ तैलचित्रे लावण्यासाठी संस्थेने ५ जनाची नावे सुचवली होती. या ९ तैलचित्रांचा अभिलेख पालिकेकडे नसल्याने ती नव्याने रंगवून सभागृहात लावणे शक्य झालेले नाही.

जानेवारी २०१६ मध्ये गटनेत्यांच्या बैठकीत तैलचित्रकार चंद्रकला कुमार कदम यांना संसद भवन, विधान भवन तसेच अनेक महापालिकांमध्ये तैलचित्रांच्या माध्यमातून आपल्या कलेची छाप उमटवल्याने त्यांना हे काम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चंद्रकला कदम यांनी ९ महापुरुषांच्या अभिलेखाचा शोध घेऊन त्यांची मूळ छायाचित्र जमवली आहेत. यामुळे त्यांना तैलचित्रे बनवण्याचे काम देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक तैलचित्रास ५ लाख २५ हजार रुपये प्रमाणे ९ तैलचित्रास ४७ लाख २५ हजार रुपये अदा केले जाणार आहेत. तसा प्रस्ताव विधी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला आहे. विधी समितीच्या मंजुरीनंतर स्थायी समितीत या प्रस्तावाला मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे.

Post Top Ad

test
test