पालिका रुग्णालयात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वेंडिग मशिन लागणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2018

पालिका रुग्णालयात ‘सॅनिटरी नॅपकिन’ वेंडिग मशिन लागणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील व महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांमध्ये तसेच मुलीच्या वसतिगृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन व नॅपकिनची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटरही बसवले जाणार आहेत. याबाबतची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी आरोग्य समितीत केली होती. त्या मागणीला आरोग्य समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.


मासिक पाळी दरम्यान देशभरात फक्त ४२ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतायत. तर, तब्बल ६२ टक्के महिला मासिक पाळी दरम्यान कापडाचा वापर करतात. ग्रामीण भागात ही संख्या खूपच कमी आहे. आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्व रुग्णालयांतील स्वच्छतागृहांमध्ये पालिकेच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या लेडीज कॉमनरूम आणि मुलींच्या वसतिगृहातही सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. नॅपकिनची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटरही बसवले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव मांडला होता. यासंदर्भात बोलताना “पालिका रुग्णालयात सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. नॅपकिन किंवा कपडे महिला शौचालयातच फेकतात. अनेकदा मलःनिसारण वाहिन्यांत सॅनिटरी नॅपकिन अडकतात. हे लक्षात घेऊन महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पालिका रुग्णालये आणि प्रसूतीगृहातील स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन आणि या नॅपकिनची शास्त्रोस्त्र पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी बर्निंग मशीन बसवण्याची मागणी केली होती.” असे सईदा खान यांनी सांगितले.

आयुक्तांच्या मंजुरी नंतर अंमलबजावणी - 
“महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्य समितीत पालिका रुग्णालयांतील स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन बसवण्याचा प्रस्ताव मान्य झालाय. परंतु, या मशीन बसवण्याचा काम अद्याप सुरू झालं नाही. आरोग्य समितीद्वारे आता हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर कामाला सुरूवात होईल.”
- रोहिणी कांबळे, अध्यक्ष, आरोग्य समिती

Post Bottom Ad