Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करा- उद्धव ठाकरे


मुंबई | प्रतिनिधी - अग्निसंरक्षक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना महापालिका अधिकाऱयांनी कुठल्‍याही राजकीय दबावाला बळी न पडता आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे आवश्‍यक आहे. कोणीही अनधिकृत गोष्‍टीला खतपाणी घालणार नाही याची प्रत्‍येक लोकप्रतिनिधींनी काळजी घेणे आवश्‍यक असून माझ्यासाठी प्रत्‍येक मुंबईकरांचा जीव महत्‍वाचा आहे. कायद्याची कडक अंमलबजावणी केली तरच याप्रकारच्‍या आगीच्‍या दुर्घटना टाळता येतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शालेय विद्यार्थ्‍यांना अग्निसुरक्षेचे धडे द्यावे तरच उद्याचे जागृत नागरिक तयार होतील अशी सूचनाही त्‍यांनी केली. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निसुरक्षा पालन कक्षांच्या २८ वाहनांचे लोकापर्ण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी भायखळा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता, युवासेना नेते आदित्य ठाकरे, उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ, आमदार अजय चौधरी, आमदार वारीस पठाण, नगरसेवक शुभांगी गुढेकर, किशोरी पेडणेकर, सुहास वाडकर, तुळसीदास शिंदे, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त कुंदन, अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कमला मिल दुर्घटनेनंतर पालिकेने हॉटेल्स, बार, रेस्टोरंट आदींवरील कारवाई सुरु केली. यावेळी राजकीय दबाव आल्याचा गौप्यस्फोट पालिका आयुक्त मेहता यांनी केला होता. नेमका तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी, भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेसह कोणाचाही राजकीय दबावाचा मुलाहीजा न ठेवता, नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आयुक्तांनी तोडक कारवाई सुरु ठेवावी. यावेळी स्वतः आयुक्तांवर कारवाई रोखण्यासाठी किंवा अन्य बाबींसाठी कधीच दबाव आणला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच राजकीय नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीं पाहता कायदा मोडणाऱ्यांच्या प्रकरणात हुरळून न जाता, उगाच अडथळा आणू नये, तुम्ही कारवाईत हस्तक्षेप केल्याने त्याचे नंतर गंभीर परिणाम होतात, हे लक्षात घ्यावे, अशी सूचना करत आपली जबाबदारी ओळखून वागावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

पालिकेने कोणताही भेदभाव न करता कायद्याची कडक अंमलबाजवणी करावी. कायदे हे जनतेसाठीच असल्याने याबाबत कोणाच्याही कपाळावर आठ्या पडण्याची गरज नाही. एखादी दुर्घटना घडली तर त्यास पालिका अथवा जो कोणी जबाबदार असेल तर त्यांनी ती जबाबदारी स्विकारावी. पालिका आयुक्त यांच्याकडे बोट दाखवणाऱ्यांनी स्वतःकडेही एक बोट दाखवून आपण एक नागरिक म्हणुन आपली जबाबदारी नीटपणे पार पाडतो आहे का, याचे आत्मपरीक्षण प्रत्येक नागरिकाने, राजकारणी, लोकप्रतिनिधी यांनी करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी, अग्निशमन दलाच्या या आगप्रतिबंधक पालन कक्षाचे स्वागत केले. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, याबाबत तपास करणारी नवीन यंत्रणा दाखल झाल्याने तपासणीचा अहवाल, नोंदी संबंधित अधिकाऱ्याला दरवेळी ऑनलाईन कराव्या लागतील. त्यामुळे कोण अधिकारी कोणत्या बाबतीत जबाबदार आहे, हे तात्काळ कळेल. शिवाय, महिन्याभरात त्याचे परिणाम मुंबईत दिसतील, असा आशावाद व्यक्त केला. कमला मिल दुर्घटनेनंतर पालिकेने अग्निशमन दलाने अधिक कडक नियम केले. गेल्या तीन वर्षात तर १७ हजार आस्थापनांची तपासणी केली. साडेतीन लाख हॉटेल, बार आदींचे परीक्षण केले. तसेच ४७०० इमारतींचीही तपासणी केल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच आगीच्या घटना रोखण्यासाठी अधिकाधिक जनजागृती आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom