अग्निसुरक्षेबाबत 4,732 गृहनिर्माण सोसायटींना नोटीस, 27 वर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2018

अग्निसुरक्षेबाबत 4,732 गृहनिर्माण सोसायटींना नोटीस, 27 वर कारवाई


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरातील मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला लागलेल्या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अग्निसुरक्षेची काळजी न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाच एका भाग म्हणून अग्निशमन दलाने मुंबईमधील तब्बल 4,732 गृहनिर्माण सोसायटींना नोटीस पाठविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान इमारतीमध्ये अग्निशामन सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी अग्निशमन दल नवे सॉफ्टवेअर सुरू करणार आहे.  

मुंबईत कमला मिल परिसरात आग लागून 14 जणांचा मृत्यू झाल्यावर अग्निसुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. याआधीही तीन वर्षांपूर्वी अंधेरी येथील लोटस पार्क या इमारतीला आग लागली होती. या दुर्घटनेत एका अग्निशमन दलाच्या जवानाचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला होता. लोटस पार्कच्या आगीनंतर काचेच्या इमारती उभारण्याबाबत नियम बनवण्यात आले तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा सक्तीची करण्यात आली होती. अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यास कारवाईचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

कमला मिल दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने महाराष्ट्र फायर प्रिवेंशन कायदा 2006 चे उल्लंघन केल्याने जानेवारी 2015 ते डिसेंबर 2017 या तीन वर्षात अग्निशमन सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 4,732 गृहनिर्माण सोसायटींना नोटीस पाठविली आहे. जर नोटीस मिळाल्यापासून 120 दिवसांच्या आत सोसायटीने सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. आता पर्यंत 27 गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. या कायदयानुसार अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यास 20 हजार ते 50 हजार रुपये दंड होईल. याव्यतिरिक्त, तीन वर्षांपर्यंत शिक्षा होण्याची शक्यता आहे.

फायर ऑडिट - 
इमारतीतील अग्निशमन यंत्रणेबाबत दर सहा महिन्यांनी ऑडिट करून अग्निशमन दलाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या याकडे लक्ष देत नाहीत. ही यंत्रणा सोसायट्या्ंनी अधिकृत एजन्सीकडून ऑडिट करावीत असा नियम आहे. राज्यभरात अशा 588 परवानाधारक एजन्सी आहेत. यापैकी 240 एजंसी मुंबईत आहेत.

Post Bottom Ad