हुक्का पार्लर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 January 2018

हुक्का पार्लर


- अजेयकुमार जाधव (Email - jpnnews100@gmail.com)
मुंबईमधील तरुण पिढी वाया जात असल्याची नेहमीच ओरड केली जाते. दारूच्या, अमली पदार्थांच्या व्यसनामध्ये नवीन पिढी वाया जात असल्याचे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र सध्याच्या काळात नवीन पिढी पब आणि हुक्का बारच्या व्यसनात अडकल्याचे समोर आले आहे. नवीन पिढी एखाद्या व्यसनात अडकत असताना सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याविरोधात कारवाई करावी अशी अपेक्षा असते. मात्र अशी कारवाई करायची सोडून राज्य सरकारने हुक्का पार्लरला कायदेशीर परवानगी दिल्याने तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्याचा परवानाच दिला आहे.

मुबंईत २९ डिसेंबरच्या रात्री कमला मिल परिसरातील एका २८ वर्षीय तरुण युवतीचा वाढदिवस साजरा केला जात असताना मोजोस या पबला आग लागली. मोजोसला लागलेली आग बाजूला लागून असलेल्या वन अबव्ह पबलाही लागली. पबमध्ये दारूच्या बाटल्यांसह आगीचा खेळ तसेच हुक्का पार्लर सुरु होता. हुक्यामुळे आग लागली व पाहता पाहता दोन्ही पब आगीमध्ये जळून राख झाले. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. पबला लागलेल्या आगीनंतर याप्रकरणी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अखत्यारीत चौकशी समिती नेमण्यात आली.

पालिका आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी सुरु असताना मुंबई अग्निशमन दलाकडून एक अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार आग हुक्क्याच्या ठिणगीमुळे लागल्याचा अहवाल अग्निशमन दलाने दिला आहे. इमारतीच्या गच्चीवर परवानगी नसताना, मोकळ्या जागेचा वापर करून, एखादी आपत्कालीन घटना घडल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नसताना दोन्ही पब सुरु होते. पालिका अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने बेकायदेशीररित्या चालवल्या जात असलेल्या या पबमुळे १४ जणांचा मृत्यू झाला.

पबमध्ये पैसेवाल्यांच्या घरातील १४ जणांचा मृत्यू झाल्यावर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री पालिका आयुक्तांनी धाव घेतली. पैसेवाल्यांच्या घरातील मृत्यूचे मुख्यमंत्र्यांना दुःख अनावर झाले. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मुंबईमधील बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याचे तसेच दोषींवर कारवाईचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कोणतीही चौकशी न करता ५ पालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. एका वॉर्ड ऑफिसर (सहाय्यक आयुक्त)ची बदली करण्यात आली. सहाय्यक आयुक्तांवर कारवाई म्हणून त्यांना सध्या कार्यरत असलेल्या वॉर्डपेक्षा आणखी मोठ्या वॉर्डाची जबादारी देण्यात आली.

कमला मिल परिसरातील पबला आग लागल्यावर मुंबईत बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. अनधिकृत, वाढीव बांधकामे तोडली जात आहेत. अनेक हॉटेल, आस्थापनांना सील लावले जात आहे. त्यांच्याकडील गॅस सिलेंडर जप्त केले जात आहे. मात्र कारवाई करताना ज्या हुक्का पार्लरमुळे आग लागली त्या प्रकारचे हुक्का पार्लर मुंबईत मोठ्या प्रमाणात आहेत. या हुक्का पार्लरवर बंदी आणावी म्हणून मुंबई महानगरपालिकेत सातत्याने मागणी केली जात आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हुक्का पार्लरवर बंदी आणावी म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.

मात्र पालिकेकडून नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार महाराष्‍ट्र (दुकाने व आस्‍थापना) अधिनियम १९४८ रद्द करण्‍यात आलेला आहे. त्‍याऐवजी महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ लागू केलेला आहे. या अधिनियमानुसार बियर बार, परमिट रुम, हुक्‍का पार्लर, डिस्‍को थेक जेथे मद्य पुरविण्‍यात येते सकाळी ११.३० ते मध्‍यरात्री १.३० पर्यंत, दारु व सर्व प्रकारची मद्याची दुकाने सकाळी ११.३० ते रात्री ११.३० पर्यंत तर चित्रपट, सिनेमागृह इत्‍यादी मध्‍यरात्री १ पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सांकेतिक स्‍थळावर उपलब्‍ध असलेले नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादी कामकाज नवीन अधिनियमानुसार बदल करण्‍यात आले आहेत. १ ते ९ कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन अर्ज स्‍वीकारणे बंद करण्‍यात आलेले आहे. १० व त्‍यापेक्षा जास्‍त कामगार संख्‍या असलेल्‍या आस्‍थापनांना नोंदणीकरण, नुतनीकरण, बदल इत्‍यादीबाबत ऑनलाईन सेवा सुरु राहणार आहे. यामुळे ज्या हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती त्याच हुक्का पार्लरला राज्य सरकारने अधिकृत केले आहे. यामुळे आता यापुढे तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्याचा राज्य सरकारने एक प्रकारे परवाना दिला आहे असे म्हणायला हरकत नाही.

Post Top Ad

test
test