Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राजधानीत राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन


नवी दिल्ली, दि. २६ - राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आशियान देशांच्या १० राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत आज राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचे शानदार प्रदर्शन बघायला मिळाले.

राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जते सोबतच १४ राज्यांचे चित्ररथ तसेच ९ केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त बालकांच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा नदाफ इजाज अब्दुल रौफचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यावर्षी प्रथमच सीमा सुरक्षा दलाच्या १०६ महिलांनी २६ मोटर सायकलहून चित्ततथारक करतब दाखवून राजपथावर इतिहास रचला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरनार्थ सदैव तत्पर राहणाऱ्या इंडिया गेट स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ देशवासीयांच्यावतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच २१ तोफांची सलामी देण्यात आली. वायु सेनेचे कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना अभूतपूर्व शौर्य व बलिदानासाठी मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’ जाहीर झाले, आज या समारंभात निराला यांच्या पत्नीने हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

यावर्षीच्या पथसंचलनात आशियान देशाला प्राधान्य देण्यात आले. पथसंचलनाच्या सुरुवातीला राजपुताना रायफलच्या 10 जवानांनी आशियान देशांचे झेंडे उंचावत आकर्षक पथसंचलन केले. यानंतर सेनेचे अश्वदल, रनगाडे, ब्रम्होस मीसाईल, स्वाती रडार, युध्द टँक, आकाश मिसाईल, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथकांची आकर्षक सादरीकरण उपस्थितांचे आकर्षण ठरले. याशिवाय एनसीसी कॅडेटस व एनएसएसच्या स्वयंसेवकांनीही पथसंचलन केले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. असामान्य शौर्य दाखविणाऱ्या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त 18 मुला-मुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थिताना अभिवादन केले. नांदेड जिल्ह्यातील नदाफ इजाज अब्दुल रौफ याचा या शूर बालकांमध्ये समावेश होता.

शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथाचे शानदार प्रदर्शन -
महाराष्ट्राच्यावतीने या पथसंचलनात शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित चित्ररथ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी राजपथावर प्रदर्शित चित्ररथामध्ये ९ वा चित्ररथ मुख्य मंचाजवळ आला तोच ‘छत्रतपी शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा प्रेक्षकांमधून आल्या. चित्ररथाच्या प्रारंभी किल्याची प्रतिकृती आणि मधोमध अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. याच ठिकाणी दोन मोठ्या तोफा आणि ध्वज, तुतारी-भालेधारी मावळे यांच्या प्रतिकृती ही उभारण्यात आल्या होत्या.

चित्ररथाच्या मध्यभागी रायगडाची प्रतिकृती दर्शविण्यात आली. सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, आभूषण देणारा दरबारी आणि त्यांच्या शेजारी पुरोहित गागाभट्ट उभे दिसत होते. या दरबारात इंग्रज अधिकारी सर हेन्‍री ऑक्सीडन दिसत होते. तसेच, न्यायाचा तराजू व त्या भोवती विविध फिरत्या प्रतिकृती दिसत होत्या. दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ, चित्ररथाच्या दोन्ही बाजूस राजमुद्रा तसेच शिवराई व होण ही नाणी प्रतिकृती रूपात दर्शविण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण गौरव सांगणारे ‘इंद्र जिमि जम्भ पर’ गीताचे शब्द उपस्थितांमध्ये स्वाभीमान जागवित होते.

केंद्रीय मंत्रालयांच्यावतीने प्रदर्शीत करण्यात आलेल्या एकूण ९ पैकी २ चित्ररथ हे विदेश मंत्रालयाचे होते. या चित्ररथांमध्ये आशियान देशांसोबत भारताचे शिक्षण, व्यापार, धर्म आणि संस्कृतिक क्षेत्रातील संबंध दर्शविण्यात आले. तसेच, भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग पासमध्ये हेलीकॉप्टर्स वर भारतीय तिरंग्यासोबत तीन सेनादलांचे झेंडे आणि आशियान देशांचे झेंडेही फडकताना दिसले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom