मॅरेथॉनमुळे बेस्टचे ३० लाखांचे नुकसान होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 January 2018

मॅरेथॉनमुळे बेस्टचे ३० लाखांचे नुकसान होणार


आयोजकांकडून नुकसान भरून घेण्याची मागणी - 
मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत रविवारी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनदरम्यान बेस्टचे १२ बसमार्ग बंद ठेवावे लागणार आहेत. यामुळे बेस्टला तब्बल ३० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. मॅरेथॉनमुळे होणारे नुकसान आयोजकांकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समिती बैठकीत केली. यावेळी दोन व तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद दरम्यान झालेले बेस्टचे नुकसान मागणी राज्य सरकारकडून करावी अशी मागणीही करण्यात आली.

मुंबईत रविवारी मुंबई मॅरेथॉन संपन्न होत आहे. या स्पर्धेदरम्यान सकाळी पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. यामुळे बसचे काही मार्ग बंद ठेवावे लागणार आहेत. तसेच मुंबई शहर ते उपनगर वांद्र्यापर्यंत बेस्टचे बसमार्ग वळवण्यात येणार आहेत. तर बरेच बसमार्ग खंडित करण्यात येणार आहेत. त्यामुळे बेस्टचे अंदाजे ३० लाखांचे नुकसान होणार आहे. उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निकालात मॅरेथॉन हे सामाजिक कार्य नसून कमावणारी संस्था असल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार आयोजकांकडून पालिकेने दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय दिला होता. पैसे दिल्यानंतरच मॅरेथॉनला परवानगी देण्याचे मान्य केले होते. असे असताना बससेवा बंद केल्यामुळे होणारे नुकसान आयोजकांकडून वसूल करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पत्रव्यवहार करावा अशी मागणीही सुनील गणाचार्य यांनी केली. तसेच दोन व तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद दरम्यान २६३ बसगाड्यांच्या १२३६ काचा फुटल्या यात बेस्टचे तब्बल २० लाख ५१ हजाराचे नुकसान झाले. तसेच बेस्ट बसचे प्रवर्तन कमी झाल्यामुळे दोन दिवसात बेस्टचे २ कोटींचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई राज्य शासनाकडून मागावी अशी मागणीही गणाचार्य यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी बंद दरम्यान दोन दिवसात ज्यांच्या वाहनांचे जे नुकसान झाले ते राज्य सरकार भरून देईल असे सांगितले होते, याच आधारावर बेस्ट उपक्रमानेनेही जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा अर्ज करावा. शासनाकडेही नुकसानीसंदर्भात मागणी करावी असे निर्देश बेस्ट प्रशासनाला बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिले.

Post Bottom Ad