महानगर बनवितांना विद्यार्थ्यांच्या संकल्पना व अपेक्षांचा सिंहाचा वाटा असेल - महापौर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 January 2018

महानगर बनवितांना विद्यार्थ्यांच्या संकल्पना व अपेक्षांचा सिंहाचा वाटा असेल - महापौर


मुंबई । प्रतिनिधी - ‘माझी मुंबई’ स्पर्धेतील स्पर्धकांनी साकारलेल्‍या चित्रातून मुंबईच्‍या विविध छटा बघायला मिळाल्‍या. बालचित्रकारांना त्यांच्या मनातील चित्रे दिलेल्या विषयांनुसार रेखाटण्यास वाव मिळत असल्याने विद्यार्थ्‍यांना एक वेगळया प्रकारचे समाधान मिळत आहे. या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून मुंबईबद्दल त्‍यांच्‍या मनात असलेले विचार, मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवितांना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पना, अपेक्षा यांचाही त्यात सिंहाचा वाटा असेल, असा आशावाद मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरांतील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत आणि महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०१७-२०१८ चे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते महापौर निवासस्थानी करण्यात आले, यावेळी प्रसारमाध्‍यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होते. यावेळी बोलताना ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणली गेली. त्यांच्या कलेपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन, उत्‍त्‍ाम चित्रकार, व्यंगचित्रकार तयार व्‍हावे, हा ‘माझी मुंबई’ बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्‍य उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्‍या चित्राचे अवलोकन केले असता, मुलांच्‍या मनात आपल्या भविष्‍यकाळातील मुंबई शहराविषयी काय विचार आहेत हे त्‍यांच्‍या चित्रातून प्रकट होत असून, हे ओळखण्यासाठी ही स्पर्धा दिशादर्शक माध्यम ठरत असल्याचे महापौरांनी सांगितले.

याप्रसंगी शिक्षण समिती अध्‍यक्षा शुभदा गुढेकर, आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, नगरसेवक सगुण नाईक, माजी नगरसेवक अनिल त्र्यंबककर, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांची मुख्य उपस्थिती होती. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून ५३ हजार ८४६ बालचित्रकारांनी सहभाग घेतला. मुंबईतील महापालिकेची उद्याने - मैदाने बालचित्रकारांच्या उपस्थितीने व त्यांच्या सुरेख चित्रांनी फुलून गेली होती. स्पर्धेतील प्रत्येक गटात प्रथम (रुपये २५ हजार), द्वितीय (रुपये २० हजार) व तृतीय विजेते (रुपये १५ हजार) आणि १० उत्तेजनार्थ (रुपये ५ हजार प्रत्येकी ) याप्रमाणे चारही गटांतून मिळून एकूण ५२ विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. त्‍यासोबतच प्रत्‍येक गटात ५ याप्रमाणे चार गटात वीस याप्रमाणे एकूण २५ विभागांमध्‍ये पाचशे उत्‍तम चित्रांना प्रत्‍येकी पाचशे रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख पन्‍नास हजार रुपयांची पारितोषिके वितरीत करण्‍यात येणार आहे. पारितोषिकांची एकूण रक्कम रुपये ६ लाख ९० हजार इतकी आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करुन समारंभपूर्वक या विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचे पालिकेच्याकडून कळविण्यात आले आहे.

Post Top Ad

test
test