Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करणार - डॉ. दीपक सावंत

मुंबई - अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ जाणवत आहे. यासाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्याचा निर्णय घेतला असून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी ‘डे केअर सेंटर’ सुरु करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या दालनात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस सहसंचालक डॉ. साधना तायडे, अल्झायमर विषयक काम करणाऱ्या संस्थेच्या विद्या शेनॉय, ठाणे मनोरुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले,राज्यात अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे येथील मनोरुग्णालयात दर आठवड्याला साधारणत: १४०० जणांची तपासणी केली जाते. त्यातील किमान सहा ते सात रुग्ण अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाचे आढळून येत आहेत. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. याकरिता राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीव जागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या क्लिनिकच्या माध्यमातून अल्झायमर विषयी ‘अर्ली डिटेक्शन सेंटर’ सुरु करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्ती विषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येतील.

पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात डे केअर सेंटर सुरु केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात येईल. त्याचबरोबर रुग्णाच्या सुश्रुषेविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. या आजाराबाबत सामान्यांमध्ये जाणीवजागृती करणे आवश्यक असून शालेय अभ्यासक्रमात त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास उपयुक्त होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom