मुंबईत एकाच दिवसात आठ ठिकाणी आगीच्या घटना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 January 2018

मुंबईत एकाच दिवसात आठ ठिकाणी आगीच्या घटना


मुंबई - मुंबईत साकीनाका येथील भानु फरसाण, कमला मिल, मरोळ येथील मेमून मेन्शन येतील आगीच्या घटनांनी मुंबई हादरली आहे. या घटनांमुळे मुंबईकर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात मंगळवारी ९ जानेवारीला एकाच दिवशी शहरात डॉकयार्ड, दादर, वरळी, जुहू, अंधेरी, कांदिवली, भूलेश्वर आणि विलेपार्ले अशा आठ ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमच्ये आणखी भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी आठ ठिकाणी लागेलेल्या आगीत दुकाने, गोदाम, हॉटेल, लाकडाची वखार, ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहेत. मात्र या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

मुंबईत आगीचा कहर वाढला असून, आगीच्या घटना थांबायचे काही नाव घेईना. ४ तारखेपासून मुंबईत सुरू असलेले आगीचे तांडव अद्याप सुरुच आहे. सोमवारी मध्यरात्री डॉकयार्ड रोड येथे लागलेल्या आगीत ७ दुकाने भस्मसात झाली. डॉकयार्ड रोड येथील बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील दारूखाना रोडवर जमेरिया बिल्डिंगजवळ शुक्ला चाळ आहे. या चाळीतील काही दुकाने तसेच गोदामे मध्यरात्री सव्वाबाराच्या जळून खाक झाली. वेल्डिंगच्या दुकानामुळे आग लागली. या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची दाहकता प्रचंड असल्याने तीला २ नंबर लेव्हलची घोषित करण्यात आली. ६ फायर इंजिन, ४ जेटीच्या साह्याने रात्री २ वाजता ही आग विझवली. तोपर्यंत तेथील ७ दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. दादर येथील गोखले रोडवरील सर्वोदय भवनमधील अनुग्रह हॉटेलमध्येही आज सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दलाने त्वरीत ही आग विझवली. मात्र या आगीत सदर हॉटेलचे किचन जळून खाक झाले. तिसरी घटना वाळकेश्वर येथील नेपियन्सी रोडवरील महेश्वरी मेंशनमधील "सी" विंगच्या पहिल्या मजल्यावर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास एच. पी.गॅस लिकेज झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली. दरम्यान, एच. पी.गॅस कंपनीच्या तज्ञानी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. चौथी घटना विलेपार्ले येथील जुहूतारा रोडवरील आनंदनगर बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावरील एका घरात घडली. सकाळी १० वाजता अचानक आग लागल्याने रहिवाशांत एकच घबराट पसरली. या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी २८ मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत घरातील समान जळून खाक झाले. या दोनही ठिकाणी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही, याबाबत पुढील तपास सुरू आहे. पाचवी घटना कांदिवली येथील चारकोप सेक्टर १ येथे देना बँकेजवळ घडली. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी आग लागली. पालपाचोळ्याला ही आग लागल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ वाजता वरळी येथील पोतदार हायस्कूल समोरील अंबिका वाईन मार्टला आग लागून त्यात सदर शॉप खाक झाले. ही आग विझते न विझते तोच सायंकाळी ५ वाजून ३७ मिनीटांनी अंधेरी येथील एसव्ही रोडवरील लाकडाच्या वखारीने पेट घेतला. या आगीने बाजूच्या लाकडाच्या वखारींना वेढले. क्षणार्धात आग भडकली आणि घटनास्थळी आगडोंब उसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. मात्र या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी असल्याने घटनास्थळी पोहचण्यास त्यांना मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी पोहचताच त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेऊन मोठया प्रयासाने आग नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची व्याप्ती लक्षात घेऊन ६ वाजून १० मिनिटांनी नंबरची आग घोषित करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिवसभरात लागलेल्या आगी नेमक्या कोणत्या कारणांमुळे लागल्या याचा तपास सुरु असल्याची माहिती पालिका आप्तकालीन विभागाने दिली.

Post Bottom Ad