मुंबईत साकारतेय पुस्तकांचे उद्यान - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

09 January 2018

मुंबईत साकारतेय पुस्तकांचे उद्यान


आमदार चौधरी आणि महापालिकेचा पुढाकार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या परेल येथे बंद पडलेल्या मिलच्या जागी उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. एकीकडे उंचच उंच इमारती उभ्या राहता असताना परेलमध्ये स्थानिक आमदार आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून खुल्या पुस्तकाचे उद्यान उभारले जात आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी या उद्यानाचे लोकार्पण केले जाणार आहे. मुंबईत हजारो उद्याने, मनोरंजन पार्क आणि खेळाची मैदाने आहेत. मुंबईत दुर्मिळ वनस्पतींचे वैविध्य असलेले वीर जिजामाता उद्यान तसेच बोरिवलीत सुगंधी वनस्पतींचे सुगंधी उद्यान आहे. त्यात आता पुस्तकाच्या उद्यानामुळे यात आणखीनच भर पडणार आहे.

महाबळेश्वर जवळील भिलार येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने पुस्तकांचे गाव अस्तित्वात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबईत पुस्तकाचे उद्यान साकारले जाते आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आणि सध्या स्मार्ट फोनच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईनगरीत वाचन संस्कृती टिकवण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. पण नागरी सुविधा देण्याची मुख्यत्वे जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेने वाचन संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

परळ परिसर म्हणजे जुन्या चाळी, पडक्या मिल्स, काही ठिकाणी मिलच्या ठिकाणी उभे राहिलेले टॉवर,केईएम, टाटा, वाडियासारख्या रुग्णालयांनी गजबजलेला. परळ स्टेशनच्या पूर्वला भारत माता थिएटर आहे. त्याच्यासमोर गगनचुंबी आयटीसी ग्रँड हाॅटेल आहे. त्याच्या पुढ्यात साडेचारशे स्क्वेअरमीटर्सचा सामाजिक सोयी-सुविधांसाठी राखीव असलेला पालिकेचा भूखंड आहे. या भूखंडावर पालिका पुस्तकांचे उद्यान उभारत आहे. पालिकेने उद्यानाचे काम पूर्ण केले अाहे. पुस्तके ठेवण्यासाठी रॅक, वाचनप्रेमींना बसण्यासाठीचे बाके यासाठी आमदार निधीचा वापर केला आहे. उद्यानात पालिकेचा एक सुरक्षा रक्षक असणार आहे. मुंबईत पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. पुस्तके भिजू नयेत तसेच ऊन-वाऱ्यापासूनही ती सुरक्षित राहावीत त्यासाठी खास स्टील रॅक बनवण्यात आली आहेत. स्टीलच्या रॅकला पुस्तके ठेवण्यासाठी कप्पे असून त्याला काचेचे दरवाजेही लावण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाचे अधिकारी संदीप राऊत यांनी दिली.

पुस्तके चाळावीत हा हेतू - 
परळ भागात पुस्तकाचे उद्यान उभारण्याची संकल्पना शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांचीच होती. त्यासाठी आमदार चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. या परिसरात शिरोडकर हायस्कूल, दयानंद महर्षी महाविद्यालय तसेच एक पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे आयटीसी हाॅटेलचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. या छोटेखानी उद्यानात विद्यार्थी जाता-येता बसतील, पुस्तके चाळतील, पुन्हा तेथेच ठेवून देतील या अपेक्षेने आम्ही पुस्तकाचे उद्यान साकारत आहोत.
- किशोर देसाई, सहाय्यक आयुक्त, एफ दक्षिण विभाग

Post Top Ad

test
test