मुंबईत फेरीवाल्यांसाठी बसण्याच्या जागा केल्या कमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 January 2018

मुंबईत फेरीवाल्यांसाठी बसण्याच्या जागा केल्या कमी

मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न काही दिवसापूर्वी पेटला होता. यानंतर मुंबईत टाऊन व्हेंडिंग कमिटी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर फेरीवाल्याच्या बसण्याच्या जागांची निश्चिती करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने फेरीवाल्यांना बसण्यासाठी 85 हजार 891 जागा निश्चित केल्या आहेत. पूर्वी 89,797 असलेल्या जागा कमी करण्यात आल्या आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या जागांमध्ये दहीसर लिंक रोडवर सर्वाधिक जागा आहेत. या जागांची सूची पालिकेने संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या असून याबाबत सूचना व हरकती 31 जानेवारीपर्यंत मागवण्यात आल्या आहेत, त्यानंतरच जागांची यादी अंतीम केली जाणार असल्याचे पालिकेकडून कळविण्यात आले आहे. 

मुंबईतील फेरीवाल्यांसाठी जागा निश्तित करण्यात आल्या असून या जागा पहिल्या जागांपेक्षा कमी करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसरातल्या जागाही कमी झाल्या आहेत. दहिसर लिंकरोडवर सर्वाधिक 1200 फेरीवाले बसणार आहेत. अंधेरी पूर्व परिसरात 8020 फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा असणार आहेत. पालिकेने प्रत्येक मार्गावर फेरीवाल्यांना बसण्याच्या जागा त्याची संख्या ठरवल्या आहेत. या जागांची सूची संकेतस्थळावर प्रकाशित झाली असल्याने फेरीवाल्यांना याची माहिती मिळणार आहे. कुर्ला, मालाड, बोरीवली परिसरात सर्वाधिक जागा असून सर्वांत कमी 802 जागा बी विभागातील डोंगरी परिसरात असणार आहेत. कुर्ला, साकिनाका परिसरात 6490 जागा तर पी- दक्षिण येथील गोरेगाव परिसरात 224 रस्त्यावर फेरीवाले बसवले जाणार असून याची संख्या 2826 असणार आहे. रेल्वे स्थानकापासून 100 मीटरच्या अंतरात फेरीवाला बसल्यास तो व्यवसाय अवैध ठरवला जाणार आहे. संकेत स्थळावरील यादी पाहून अनेकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काही अनेक वर्षापासून बसत असल्याने त्यांच्या जागा जाणार असल्याने व्यवसायावर परिणाम होईल असे त्यांना वाटते आहे, तर काहींनी जागांबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची तपासणी सॉफ्टवेरद्वारे - 
31जानेवारीनंतर फेरीवाल्यांच्या जागांबाबतची प्रक्रिया वेग घेणार आहे. पूर्वीच्या सर्व्हेत ज्यांनी कागदपत्र जमा केली होती, त्यांच्या तपासणीसाठी सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. त्यानुसार विभागनिहाय कागदपत्रे तपासली जाणार आहे. पात्रता निश्चित झाल्यावर अशा फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जाईल. यातील प्रमुख जबाबदारी टाऊन वेंडिंग कमिटीची असणार आहे. 

Post Bottom Ad