महाराष्ट्र बंद दरम्यान मुंबई ठप्प - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 January 2018

महाराष्ट्र बंद दरम्यान मुंबई ठप्प


मुंबई । प्रतिनिधी -
भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दगडफेकीचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर बुधवारी आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबईत सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी रास्ता रोको, रेल रोको केल्याने बस, ट्रेन आणि मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम होऊन मुंबई ठप्प झाली होती.

भीमा कोरेगाव येथे सोमवारी भीम सैनिकांवर झालेल्या दगडफेकीचे पडसाद त्याच दिवसापासून महाराष्ट्रासह मुंबईत उमटू लागले होते. मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. रास्ता रोको तसेच रेल रोको करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदच्या हाकेला भीम अनुयायांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. 

मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासूनच भीम सैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुंबईत सकाळपासूनच कडकडीत बंदला सुरुवात झाल्याचे चित्र होते. बंद जाहीर करण्यात आल्याने रिक्षा टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळ पासूनच भीम सैनिकांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, दादर, गोरेगाव, कांदिवली, विरार, गोवंडी, चेंबूर, जुईनगर, शिवडी इत्यादी स्थानकांवर रेल रोको आंदोलन केले. आंदोलकांनी रेल ट्रॅकवर उतरुन आंदोलन केल्यामुळे वाहतूक मोठ्या विस्कळीत झाली. 

दुकाने, हॉटेल्स, स्कूल बसेस, काही खासगी शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. आंदोलनांमुळे मुंबईतील मल्टिप्लेक्समधले आणि सिंगल स्क्रिन थिएटरमधल्या चित्रपटांचे शोही रद्द झाले होते. दादर, भायखळा, मरोळ, क्राफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट आदी ठिकाणी रोजच्या गजबजलेल्या बाजारात शुकशुकाट होता. 
मुंबईत सकाळपासूनच शहरातील छोटी - मोठी सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल्स, टप-या बंद ठेवण्यात आली होती. 

मुंबई विमानतळाबाहेर वाहनं उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. रिक्षा-टॅक्सी नसल्यामुळे एअरपोर्टवरच थांबण्याचा अनेकांनी निर्णय घेतला होता. रोज गजबजलेल्या दादरच्या बाजारामध्ये शुकशुकाट होता. रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांनी बसेससाठी गर्दी केली. मात्र काही ठिकाणी रास्तारोको करून आंदोलकांनी ९० बसेसचेही नुकसान केल्याने प्रवाशांचे हाल झाले. रस्तारोकोमुळे वरळी नाक्यावरची वाहतूक बंद करण्यात आली. 

मुंबईची नाकाबंदी - 
मुंबई शहराचे प्रवेशद्वार असलेला पनवेल सायन महामार्ग, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, वांद्रे कलानगर जंक्शन, इस्टर्न एक्स्प्रेस वे, एलबीएस रोड, दहिसर चेक नाका, आयआयटी पवई, सांताक्रूझ वाकोला, विक्रोळी, पवई, दादर. परेल, वरळी इत्यादी ठिकाणी महत्वाच्या रस्त्यावर रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्याने मुंबईची नाकाबंदी झाली.

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात तोडफोड - 
कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी जमावाने मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. जमावाने स्टीलच्या चेअर्स, टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते.

घाटकोपरमध्ये गाड्यांची जाळपोळ - 
घाटकोपर परिसरात इस्टर्न एक्स्प्रेस हायवे व एलबीएस मार्गावर रास्तारोको आंदोलन करून महामार्ग बंद पाडण्यात आले. घाटकोपरच्या एलबीएस रोडवरील आरसिटी मॉलच्या जवळ १५ ते २० गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. यावेळी काही गाडया फोडण्यात आल्या आहेत. टायर जाळण्यात आले आहेत.

दादर बंद - 
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज नायगाव, भोईवाडा, दादर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता आणि रेल रोको आंदोलन केले. नायगावाच्या लोकसेवा संघातून रॅलीला सुरुवात झाली होती. शिवडीमार्गे भोईवाडयात ही रॅली आल्यानंतर मोठया संख्येने आंदोलक सहभागी झाले. हिंदामात परिसरातून जाणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. शिवडी रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. 

Post Top Ad

test
test