Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नायर रुग्णालयात हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू


डॉक्टर आणि वॉर्डबॉयला अटक -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटना ताज्या असतानाच रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नायर रुग्णालयात राजेश मारू या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे मृताचे नातेवाईक संतापले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी डॉक्टर, नर्स व वॉर्ड बॉय यांना निलंबित करण्यात आले आहे. राजेश यांच्या मृत्यू प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टर व वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजेश मारू हा तरुण आपल्या बहिणीच्या सासूला बघायला मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये गेला होता. रुग्णाचा एमआरआय करायचा असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने राजेशला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायला सांगितले. एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास परवानगी नसते. एमआरआय मशिन बंद आहे त्यामुळे सिलेंडर आत नेण्यास हरकत नाही असे वॉर्डबॉयने सांगितले. यामुळे राजेश ऑक्सिजनचा सिलेंडर आत घेऊन गेला. मात्र आतमध्ये मशिन सुरूच असल्याने सिलेंडर सकट तो एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला. राजेशचा हात एमआरआय मशिनमध्ये अडकला. अचानक हा प्रकार घडल्याने कोणालाच काही करता आलं नाही. अखेर वॉर्ड बॉयच्या मदतीने मशिन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे मृताचे नातेवाईक संतापले असून दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत राजेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच नातेवाईकांनी सांगितलयं. याबाबत मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या डीनच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं. मृताच्या नातेवाईकांना मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक मदत देण्यासाठी सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. राज्य सरकारकडूनही मृताच्या नातेवाईकांना मदत मिळवून दिली जाणार असल्याचे लोढा यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणी डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि नर्स या 3 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच आग्रीपाडा पोलीस ठाण्यात डॉ. सिद्धांत शहा, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, महिला कर्मचारी सुनीता सुर्वे यांच्या विरोधात आयपीसीच्या 304(अ) नुसार गुन्हा (28/2018) दाखल करण्यात आला आहे. डॉ. सिद्धांत शहा (२४), वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण (३५) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मृताच्या नातेवाईकाला मदत -नायर रुग्णालयातील दुर्घटनेत मृत राजेश मारू यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दोषींवर कारवाई घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- रोहिणी कांबळे, अध्यक्षा, आरोग्य समिती

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom