गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास पालिका आयुक्तांचा नकार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 January 2018

गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यास पालिका आयुक्तांचा नकार


मैदान, मंड्या, बस स्थानकात पालिकेची सुरक्षा नसल्याने दिला नकार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील गुन्हेगारी कारवायांवर अकुंश लावण्यासाठी मुंबईमधील खेळाच्या मैदानात, मंड्यात तसेच बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. मात्र या ठिकाणांवर महापालिकेची सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे कारण देत सीसीटीव्ही यंत्रणा लावता येणार नसल्याचा अभिप्राय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिला आहे.

मुंबई शहरातही सर्व मुख्य रस्त्यांच्या नाक्यांवर सीसीटीव्ही लावण्यात आल्यानंर गुन्हेगारी व असामाजिक कारवायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीतील खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, मंड्या, बसस्थानके यासारख्या गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असामाजिक व गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे. या ठिकाणी महिलांची छेड काढणे, लहान मुलांचे अपहरण होणे असे प्रकार सर्रास होत असतात. ही वस्तुस्थिती पाहता समाजविरोधी गुन्हेगारी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील सर्व खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, मंड्या, बस स्थानके यासारख्या गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी बाजार व उद्यान समितीकडे ठरावाच्या सुचेनाद्वारे केली होती.

जावेद जुनेजा यांनी बाजार व उद्यान समितीकडे मांडलेली ठरावाची सूचना पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आली होती. सदर ठरावाच्या सूचनेवर अभिप्राय देताना महापालिका रुग्णालय, विभाग कार्यालय इत्यादी ठिकाणी सुरक्षा रक्षक खात्याचे कर्मचारी, अधिकारी कार्यरत असल्याने याठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेवर देखरेख करण्याचे काम त्यांच्या मार्फ़त केले जाते. परंतू महापालिकेच्या हद्दीतील खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, मंड्या, बसस्थानके यासारख्या गर्दीच्या ठिकाणी महापालिकेची सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे शक्य नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. महापालिकेचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी नसल्याचे कारण देत सीसीटीव्ही लावण्यात येऊ शकत नाही असा अभिप्राय देत आयुक्तांनी जावेद जुनेजा यांची ठरावाची सूचना निकालात काढली आहे.

Post Top Ad

test
test