Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बंदमुळे एसटीला २०, रेल्वेला ३ तर बेस्टला २ कोटींचे नुकसान


मुंबई । प्रतिनिधी - भीमा कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ दरम्यान पश्चिम, मध्य रेल्वेचा ३ कोटी ३८ लाख रुपयांपर्यंतचा महसूल बुडाला आहे. एसटी महामंडळाचे राज्यस्तरावर सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बेस्ट उपक्रमाच्या २८६ बसेसची तोडफोड झाल्याने २ कोटी ५० लाखांच्या वर नुकसान झाले आहे. तसेच बंद दरम्यान बेस्टचा १ कोटी ८७ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.

मध्य रेल्वेस मालवाहतुकीपोटी एका दिवसाला चार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. रेल्वेमार्गावर दैनंदिन प्रवाशांची संख्या मोठ्या स्तरावर असून, गेल्या वर्षी ३ जानेवारी रोजी मध्य रेल्वेवर एका दिवसात १० लाख ६५ हजारांची तिकीटविक्री झाली होती. पण बुधवारी ही संख्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी होती. त्याचप्रमाणे गतवर्षी ३ जानेवारी रोजी ५ कोटी १९ लाख रुपयांच्या तुलनेत बुधवारी ही रक्कम २.५० कोटी रुपयांच्या आसपास होती. पश्चिम रेल्वेवर गतवर्षी याच दिवशी २ कोटी ३३ लाख रुपयांवर महसूल मिळाला असताना बुधवारी ही संख्या १ कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल मिळाला. बंद काळात डोंबिवली स्थानकातील तिकीट खिडकी तोडण्यात आली तसेच कांजूरमार्ग स्थानकाचेही मोठे नुकसान झाले. स्थानकातील आठ सीसीटीव्ही कॅमेरे, दोन घड्याळे, चार इंडिकेटर, अनेक ट्यूबलाइट्स फोडण्यात आल्या असून, पाण्याच्या मश‌निचेही नुकसान करण्यात आले आहे.

मंगळवार आणि बुधवारच्या दोन दिवसांत २१७ बसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाला अंदाजे एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच, राज्यातील २५० पैकी २१३ आगारांतील वाहतूक बंद असल्याने १९ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे. तोडफोड झालेल्या २१७ बसेस पुढील काही दिवस रस्त्यावर येणार नसल्याने महसुलात घाट होणार असल्याने या तोट्यात आणखी भर पडणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईमधील दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या एकूण २८६ बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. बुधवारी २०४, मंगळवारी ८० आणि त्याशिवाय सोमवारी ३ बसगाड्यांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान देवनार आगारामध्ये झाले आहे. देवनारमध्ये ३१ विक्रोळी आगारात २९ बसेस फोडण्यात आलेल्या आहेत. बसेसची तोडफोड झाल्याने २ कोटी ५० लाखांच्या वर नुकसान झाले आहे. बेस्टला एका दिवसाला सुमारे ३ कोटी २८ लाख रुपये तिकीट विक्रीतून मिळतात. १ जानेवारीला २ कोटी ७६ लाख, २ जानेवारीला ३ कोटी २८ लाख तर ३ जानेवारीला १ कोटी ३७ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. बंदच्या दरम्यान बेस्टचा १ कोटी ८७ लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom