रेल्वे अपघातात 3014 प्रवाशांचा मृत्यू - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 January 2018

रेल्वे अपघातात 3014 प्रवाशांचा मृत्यू


334 महिला प्रवाशांचा मृत्यू -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईकर नागरिकांची लाईफलाईन म्हणून रेल्वेची ओळख आहे. मात्र मुंबईकरांची लाईफलाईन डेथलाईन ठरत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे मार्गावर 3 हजार 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 3 हजार 345 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. याच कालावधीत 334 महिलां प्रवाशांचा मृत्यू झाला असून 697 महिला जखमी झाल्या आहेत.

समीर झव्हेरी यांनी रेल्वे पोलिसांकडे जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीतील रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू आणि अपघातांची आकडेवारी मिळवण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला होता. याबाबत उपलब्ध करण्यात आलेल्या माहिती नुसार जानेवारी ते डिसेंबर 2017 या कालावधीत विविध कारणांमुळे मध्य रेल्वेवर 1 हजार 928 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व 1805 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर 1 हजार 86 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे व 1540 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेची आकडेवारी पाहता रेल्वे प्रवासादरम्यान गेल्या वर्षभरात 3 हजार 14 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 3 हजार 345 प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात 292 प्रवाशांचा अपघात झाला असून, यात 137 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 155 प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी स्थानकात गेल्या वर्षभरात 220 अपघात घडले असून, यात 70 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 150 प्रवासी जखमी झाले आहेत. हार्बर मार्गावर वर्षभरात झालेल्या विविध अपघातांत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 47 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे वडाळा रोड स्थानकात घडले आहेत.

वर्षभरात 334 महिला प्रवाशांचा मृत्यू - 
माहिती अधिकारात आणखी एक आकडेवारी समोर आली आहे. अपघातांमध्ये महिला प्रवाशांचेही प्रमाण मोठे आहे. 2015 मध्ये 369, 2016 मध्ये 364 तर 2017 मध्ये 334 महिला प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या वर्षभरात 1 हजार 31 महिलांचा रेल्वे प्रवासादरम्यान अपघात झाले. यात 334 महिलांचा मृत्यू झाला असून 697 महिला जखमी झाल्या आहेत. रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे वर्षभरात 184 महिलांचा मृत्यू तर 62 महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. गर्दीमुळे चालत्या लोकलमधून बाहेर पडून 58 महिला प्रवाशांना जीव गमवावा लागला असून 276 महिला जखमी झाल्या आहेत.

Post Top Ad

test
test