Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रस्ते घोटाळ्याचा अहवाल 31 जानेवारीपर्यंत सादर होणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत दोन वर्षांपूर्वी रस्ते घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात तब्बल २३४ रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचे समोर आले होते. २३४ पैकी ३४ रस्त्यांच्या घोटाळ्याचा अहवाल नुकताच चौकशी समितीने आयुक्तांना सादर करण्यात आला होता. इतर २०० रस्त्यांच्या चौकशी अहवाल कधी जाहीर होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर पालिका प्रशासनाने ३१ जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल जाहीर केला जाईल असे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी पालिका सभागृहाला स्पष्टीकरण दिले आहे.

नाले सफाई घोटाळ्यात दोषींवर जशी कारवाई झाली, तशी रस्ते कामांच्या घोटाऴ्यातील संबंधितांवर कारवाई करावी. कंत्राटदारांवर एफआयआर दाखल करावा व भ्रष्ट अधिका-यांना निलंबित करावे आणि त्यांच्याकडून खर्च वसूल करावा, अशी मागणी मंगळवारी विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी निवेदनाद्वारे केली. नुकताच सादर केलेल्या ३४ रस्त्यांच्या चौकशी अहवालाअंतर्गंत ९६ अभियंत्यांवर कारवाई झाली. यांत 4 अधिका-यांना घरी बसवण्यात आले आहे. दोषी अधिका-यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या अहवालानंतर उर्वरित २०० रस्त्यांचा अहवाल जवळपास पूर्ण झाला असून येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर केला जाणार जाईल, असे अतिरिक्त आयुक्त कुंदन यांनी सभागृहात सांगतिले. तब्बल ३५२ कोटींचा हा घोटाळा असून यात मोठ्या प्रमाणात बडे कंत्राटदार व पालिकेतील अभियंता अडकण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी मुंबईतील तब्बल २३४ रस्त्यांच्या कामांतील ३५२ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यातील अहवालात काही कंत्राटदार आणि दोन पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर ३४ रस्त्यांचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर झाला. यात पालिकेतील १०० अभियंत्याची चौकशी करण्यात आली. यात तब्बल ९६ अभियंत्याना दोषी ठरविण्यात आले. ४ अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण अजूनही २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल बाकी आहे. या अहवालाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या 15 दिवसांत सादर केला जाणार आहे. या अहवालात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. तसेच कंत्राटदारांसह अभियंतेही अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेतील सर्वात मोठी कारवाई असल्याची नोंद होणार आहे. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्त्याच्या कामात ८०% भ्रष्टाचार आणि २० % काम होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमून रस्ते कामातील घोटाळा उघडकीस आणून कारवाईला सुरुवात केली. दोन वर्षानंतरही कारवाई सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या अहवालात किती जण अडकणार व त्यांच्यावर काय़ कारवाई होणार यांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom