तृतीयपंथी कल्याण मंडळाची लवकरच स्थापना - राज्यमंत्री दिलीप कांबळे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2018

तृतीयपंथी कल्याण मंडळाची लवकरच स्थापना - राज्यमंत्री दिलीप कांबळे

मुंबई - तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी तसेच त्यांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना येत्या १५ दिवसात करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.

तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव ला. र. गुजर, उपसचिव दि.वा.करपे, अवर सचिव सि. अ. झाल्टे, कक्ष अधिकारी कृ. त्रि. कदम, तृतीयपंथियांचे प्रतिनिधी लक्ष्मी नारायण त्रिपाठी, पवित्रा निंभोरकर आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री कांबळे म्हणाले, येत्या १५ दिवसात तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी मंडळाची रचना पूर्ण करण्यात येईल. सुरुवातीला या मंडळासाठी ५ कोटीची तरतूद करण्यात येईल. या मंडळासाठी केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होईल. भविष्यात तृतीय पंथीयांच्या सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना या मंडळामार्फत राबविण्यात येतील. या मंडळामुळे तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल.

लक्ष्मी त्रिपाठी यावेळी म्हणाल्या, या मंडळाच्या घोषणेमुळे या समाजाला नवी दिशा मिळेल. या घटकाच्या शिक्षण, रोजगार, निवासाचे, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल व या समाजाच्या संविधानिक व मानवी हक्काचे संरक्षण होईल.

Post Bottom Ad