Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईमधील चौकास इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे नाव देण्यास नकार

मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील सुप्रसिद्ध असलेल्या काळा घोडा परिसरातील चौकास इस्त्रायल देशाच्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्याच्या पालिका प्रशासनाच्या प्रस्तावास गटनेत्यांच्या बैठकीत विरोध करण्यात आला. त्यामुळे मुंबईमधील चौकास परदेशी व्यक्तीचे नाव देण्याच्या प्रस्ताव मंजुरीविना परत पाठवण्यात आला. याबाबत पुढील गटनेत्यांच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. 

कुलाबा येथील फेडरेशन ऑफ इंडो इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी इस्त्रायल देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत शिमोन पेरीज यांचे नाव काळा घो़डा परिसरातील एका चौकास देण्याबाबत विनंती केली होती. शिमोन पेरीज यांनी आयुष्यभर ज्यू लोकांसाठी व त्यांच्या हितासाठी समर्पित वृत्तीने काम केले. ते महात्मा गांधींच्या अहिंसावादी शांततेच्या मार्गाने चालणारे होते. त्यांनी देशाच्या तसेच जागतिक शांततेसाठी प्रत्येकक्षणी प्रयत्न केले. तसेच त्यांनी इस्त्रायलच्या सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान अशी पदे भूषवली होती. त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही बहाल करण्यात आले होते. ए विभागातल्या काऴाघोडा परिसरातील व्ही. बी. गांधी रोड आणि साईबाबा मार्ग येथील चौकास शिमोन पेरीज या इस्त्रायली नेत्याचे नाव देण्यात यावे, असे फेडरेशनने आपल्या पत्रात नमूद केले होते. त्यानुसार या नामकरणाचा प्रस्ताव मंगळवारी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला आला होता. मात्र परदेशी व्यक्तीचे नाव देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी विरोध केला. त्यामुळे सदर प्रस्ताव मंजूर न होता. परत पाठवण्यात आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom