पालिकेच्या इमारती पाडून अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारला जाणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या दोन इमारती पाडून त्याजागी अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली असून येत्या तीन वर्षात जिमखाना उभारला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी येथील केशव खाडे मार्गावर नगर भूमापन क्रमांक ४७/६ वर पालिकेच्या दोन इमारती आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून या इमारती पाडून त्या भूखंडावर अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारला जाणार आहे. याकामासाठी पालिकेच्या दोन मोडकळीस आलेल्या इमारती पाडल्या जाणार आहेत. या इमारतींच्या जागेवर पालिका अधिकाऱ्यांसाठी जिमखाना बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जिमखान्यासाठी नवीन भिंत, पर्जन्य जल वाहिनी, आरसीसी जलतरण तलाव, खेळांसाठी खोल्या, व्यायामशाळा, आहारगृह, सभागृह, टेनिस कोर्ट, कॉन्फरंस हॉल, पाहुण्यांसाठी दहा खोल्या बांधणे व इतर कामांसाठी लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. याकामांसाठी कंत्राटदाराला ४८ कोटी ७५ लाख २४ हजार ७८४ रुपये इतकी रक्कम अदा केली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
Tags