पालिकेची ऑनलाईन फाईल्स प्रणाली 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2018

पालिकेची ऑनलाईन फाईल्स प्रणाली 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार

मुंबई । प्रतिनिधी - 
मुंबई महानगरपालिकेच्या फाईल्स अनेक महिने एकाच टेबलवर धूळ खात पडलेल्या असतात. या फाईल्सचा निपटारा लवकरात लवकर लावता यावा व कामकाजात पारदर्शकता आणता यावी म्हणून ई- ऑफिसद्वारे ऑनलाईन फाईल्स प्रणाली सुरु करण्यात आली होती. ही प्रणाली गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. बंद पडलेली ई- ऑफिसद्वारे ऑनलाईन फाईल्स प्रणाली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी तसे परिपत्रक काढले आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सिंघल यांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी झाल्यास पालिका कार्यालयात पडणारा फाईलींचा ढिग, खर्च, कामांचा तात्काऴ निपटारा आणि कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने 2012 साली ई- ऑफिसच्याद्वारे फाईल्सची प्रक्रिया ऑनलाईन करण्याची काम सुरु केले. मात्र त्यानंतर 2014 साली ही प्रक्रिया पुढे न सरकता बंद पडली. मुंबई महापालिकेतील विविध प्रकारच्या फाईल्सचा ढिगारा साचतो. यातून हवी ती फाईल्स व त्यावरील रिमार्क शोधण्यासाठी वेळ जातो. परिणामी वेळेत कामे होत नाहीत. शिवाय कामकाजात पारदर्शकता येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी 2012 साली ई -ऑफिसद्वारे या फाईलींचा ऑनलाईन प्रयोग सुरु केला. मात्र त्याला य़श आले नाही. ही प्रक्रिया बंद पडल्यानंतर पालिकेत पुन्हा फाईलींचा पसारा सुरू झाला. आता हा प्रयोग पुन्हा सुरु करण्यासाठी पालिकेने निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक काढल्याने 1 फेब्रुवारीपासून याचे काम पुन्हा सुरु होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे फाईल्स, कागदपत्रे यांचा पसारा तसेच आवश्यक फाईल्स शोधणे कठीण होणार नसून एका क्लिकव्दारा हवी ती माहिती मिळणार आहे. त्यामुळे खर्च वाचणार आहेच, पण कामकाजातही पारदर्शकता येणार आहे. अनेकवेळा महत्वाच्या कामाची फाईल्स अनेक टेबलवर फिरत असते. वेऴेत निपटारा झाला नाही, तर फायलींच्या ढिगा-य़ाखालून अशा फायली शोधाव्या लागतात. ऑनलाईन प्रक्रिया झाल्यास हवी असलेली फाईल्स, त्यावरचा रिमार्क शिवाय अन्य माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

Post Bottom Ad