Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

निवडणूक कामावरील पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामांना प्रतिनियुक्तीवर पाठवले जाते. निवडणुकीच्या कामासाठी गेलेले कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू होत नसल्याने पालिका आयुक्तांना परिपत्रक काढावे लागले आहे. या परिपत्रकानुसार निवडणूक कामासाठी गेलेले कर्मचारी १ फेब्रुवारीपासून पालिकेच्या सेवेत रुजू न झाल्यास त्यांचे वेतन बंद करण्याची तंबी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने मतदारांच्या याद्या अद्यावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मुंबई शहर, उपनगरातील ३६ विधानसभा मतदार संघातील याद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार होते. ३ ऑक्टोबर २०१७ ते ३० नोव्हेंबरपर्यंत कालावधी दिला होता. पालिकेच्या विविध खात्यातून अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग असे १ हजार ६९८ कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. परंतु, नियोजित वेळेते हे काम पुर्ण न झाल्याने १५ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ दिली. दरम्यान, निवडणुकीच्या कामात पालिकेचे कर्मचारी व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज रखडले होते. मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूटपणे आपला कर्मचारीवर्ग खात्यातून दिला होता. मात्र निवडणुकीच्या कामाला दिलेली मुदतवाढ संपली असून महिना उलटून गेला तरी कर्मचारी व अधिकारी अद्याप परतलेले नाहीत. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी पाठवलेले कर्मचारी वर्षभरानंतरही पालिका सेवेत रुजू झालेले नाहीत. याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे काम संपले असल्यास सर्व पालिका कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मोकळे करावे, अशी मागणी पालिका प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परिपत्रकाद्वारे केली आहे. यात निवडणूक कर्तव्यावर पाठविलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत परत बोलावून घ्यावे. जे कर्मचारी मुदतीच्या वेळेत हजर राहणार नाहीत, त्यांचे वेतन बंद केले जाईल, अशा सूचना केल्या असून याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी, असे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom