Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राजपथावरील पथसंचलनासाठी शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथ सज्ज

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’वर आधारित चित्ररथ सज्ज झाला आहे. चित्ररथात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी कसून सराव केला आहे. चित्ररथाची बांधणीही पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रासह 14 राज्यांचे आणि 9 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हिच गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’ वर आधारित चित्ररथ राजपथावर प्रदर्शीत होत आहे. राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 40 कारागिरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे.

असा असणार चित्ररथ -
चित्ररथाच्या प्रारंभी किल्याची प्रतिकृती असून यावर मधोमध अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी दोन मोठ्या तोफा आणि ध्वज, तुतारी-भालेधारी मावळे यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या मध्यभागी रायगडाची प्रतिकृती दर्शविण्यात आली असून याठिकाणी सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आभूषण देणारा दरबारी आणि त्याच्या शेजारी पुरोहित गागाभट्ट उभे आहेत. या दरबारात इंग्रज अधिकारी सर हेन्‍री ऑक्सीडन दिसत आहेत. तसेच,न्यायाचा तराजू व त्या भोवती विविध फिरत्या प्रतिकृती आहेत. त्याच्या शेजारी ध्वजधारी,अश्वारूढ मावळ्यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे ही दर्शविण्यात आलेले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस राजमुद्रा तसचे शिवराई व होण ही नाणी प्रतिकृती रूपात दर्शविण्यात आल्या आहेत.

चित्ररथावर 10 कलाकार देणार प्रस्तुती -
चित्ररथावर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यात येणार आहे. याशिवाय राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजीराजे, गागाभट्ट, नजराना पेश करणारा दरबारी, इंग्रज अधिकारी आदी प्रत्यक्ष भूमिका साकारण्यात येणार आहेत. मुंबई येथील भैरी भवानी गृपचे 10कलाकार या भूमिका साकारणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom