प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी रेल्वे सज्ज - मुख्यमंत्री - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

26 January 2018

प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी रेल्वे सज्ज - मुख्यमंत्री

मुंबई, दि. २६ - प्रवाशांना अत्याधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबरच रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी रेल्वेची यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ते आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित प्रवाशांसाठीच्या विविध सुविधांच्या ई-लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, आजच्या प्रजासत्ताक दिनी रेल्वेने विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे. गेल्या तीन वर्षात पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेने मोठी झेप घेऊन प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नेरळ-माथेरान ही रेल्वे पर्यटकांचे आकर्षण आहे. तिच्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवून ती पुन्हा सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर २६ अतिरिक्त फेऱ्या सुरु करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. विविध ठिकाणी पादचारी पूल, एस्केलेटर्स, जिने, लिफ्ट, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, बुकिंग कार्यालय, वायफाय सेवा, ५२ स्थानकांवर एल.ई.डी. लाईटिंग अशा अनेक अत्याधुनिक सेवा सुविधा प्रवाशांना देऊन रेल्वेने आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली आहे. येत्या काळात स्वच्छ रेल्वे स्थानके पहायला मिळतील. रेल्वे स्थानकांचा चेहरा मोहरा बदललेला असेल. सीएसटी-पनवेल आणि चर्चगेट-विरार दरम्यान इलेव्हेटेड कॉरिडोर मार्ग लवकरच सुरु करणार आहोत, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून अत्याधुनिक सुविधा मिळेल. अलिकडेच रेल्वेने वातानुकूलीत रेल्वे सेवा सुरु करुन प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा प्राप्त करुन दिली आहे. वाहनांच्या प्रचंड वाहतुकीमुळे प्रदुषण वाढत असताना प्रवाशांनी रेल्वेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, नेरळ, टिळक नगर आणि सांताक्रुझ स्थानकांवर पादचारी पूल, विद्याविहार स्थानकावर पादचारी पुलास अतिरिक्त जिना, लोअर परळ आणि बोरीवली स्थानकांवरील पादचारी पुलाचा विस्तार, ठाणे आणि दादर स्थानकांवर एस्केलेटर्स, दादर, मानखुर्द, रे रोड आणि बोरीवली स्थानकांवर लिफ्ट, ग्रँट रोड,विरार कार शेड, लोअर परळ आणि माहीम येथे सौर ऊर्जा संयंत्र, गोवंडी आणि टिटवाळा स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, किंग्ज सर्कल स्थानकांवर बुकिंग कार्यालयाचे ई-उद्घाटन करण्यात आले. मध्य रेल्वेवरील ५२ स्थानकांवर १०० टक्के एल.ई.डी. लाईटिंग, एलफिन्स्टन रोड स्थानकावर पादचारी पुलास अतिरिक्त जिना, वडाळा रोड आणि बदलापूर स्थानकांवर वाय-फाय सेवेचे ई-लोकार्पण करण्यात आले. मध्य रेल्वेवर २६ अतिरिक्त उपनगरीय सेवांची रिमोटद्वारे तसेच अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नेरळ आणि माथेरान दरम्यान रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून पुन: सुरूवात करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, खासदार किरीट सोमय्या, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post Top Ad

test
test