Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे हारून खान यांचा भाजपात प्रवेश ?


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिलेल्या हारून खान यांनी आपल्या मुलासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. मुंबईमधील चांदिवली विधानसभेमधून खान यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी ही सत्ता खेचून आणायची तयारी भाजपकडून सुरु आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला जाणार होता. मात्र या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असता तर मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संबंधांवर याचे परिणाम झाले असते. यामुळे भाजपात प्रवेश न दिल्याने या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या नागरसेवकांमुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. पालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात आणणे गरजेचे आहे. यासाठी विक्रोळी पार्क साईट, घाटकोपर, पवई याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड बनवणाऱ्या हारून खान व त्यांचा मुलगा रोशन खान यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश दिला आहे. हारून खान यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजपा खासदार किरीट सोमय्या, महापालिकेतील भाजपा गटनेते मनोज कोटक उपस्थित होते. हारून खान यांनी २००२ मध्ये पालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. २००५ ते २००७ पर्यंत भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे ईशान्य मुंबईचे ते जिल्हाध्यक्ष होते. २००७ व २०१२ मध्ये ते दोन वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी नगरसेवकपद भूषविले आहे. हारून खान यांच्या पत्नी ज्योती खान या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक १२४ मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हारून खान यांचा प्रवेश भाजपासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पक्षांतर कायदा लागू असल्याने ज्योती खान यांनी आपले नगरसेवकपद रद्द होईल या भीतीने अद्याप भाजपात प्रवेश केला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. हारून खान यांनी पक्षात प्रवेश केल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. मात्र हारून खान यांनी भाजपात प्रवेश केला नसल्याचे सांगितले आहे. मी कामानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तिथे माझे स्वागत करण्यात आले. मी भाजपात प्रवेश केलेला नाही असे हारून खान यांनी पत्रकारांना सांगितले आहे. यामुळे हारून खान यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला का याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom