बंदमुळे मुंबईतल्या रुग्णालयातही शुकशुकाट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 January 2018

बंदमुळे मुंबईतल्या रुग्णालयातही शुकशुकाट

मुंबई । प्रतिनिधी - महाराष्ट्र बंदमुळे मुंबई महापालिकेच्या केईएम, शिव आणि नायर या रुग्णालयातील रोज ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत कमी होती. दरम्यान ठरलेल्या शस्त्रक्रिया वेळेत पार पडल्या. वाहतूक ठप्प असल्याने दुपारच्या सत्रातील कर्मचा-यांना वेळेत पोहचता आलेले नाही. मात्र त्याचा परिणाम रुग्णावर झाला नसल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. 

केईएमध्ये ओपीडीसाठी बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे 3000 रुग्ण उपचारासाठी आले होते. येथे इतरवेळी सात ते आठ हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. नायर रुग्णालयात 3 वाजेपर्यंत 396 रुग्ण तपासणीसाठी आले होते. तर आयपीडीसाठी 93 इतरवेळी ही संख्या मोठी असते. येथे 35 मेजर सर्जरी तर सर्वसाधारण सर्जरी 15 करण्यात आल्या. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयांत सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत 64 रुग्ण भरती झाले. बाह्यरुग्ण विभागात 380 नवीन रुग्ण भरती झाले. ही संख्या रोजच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी होते. रक्तपेढ्यांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगाही कमी होत्या. रोज दीडशे ते 200 रक्ताच्या बाटल्या लागतात. बुधवारी 100 ते 125 बाटल्या लागल्या. महाराष्ट्र बंदमुळे येथे रोज रुग्णांच्या नातेवाईकांची असलेली वर्दळही कमी होती. 

Post Bottom Ad